राजकीय कारकिर्दीतील यशस्वी संघटक
सावंतवाडी तालुका भंडारी समाजाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी राजकीय कार्यकर्ते यशवंत अर्जुन वेंगुर्लेकर वय ६६, रा.भोमवाडी, आजगाव यांचे शुक्रवारी कोल्हापूर येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. गेली काही वर्षे ते आजारी होते, कोल्हापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या कणखर आणि बुलंद आवाजासाठी ते जाणले जायचे. त्यांची भाषणशैली वाखाण्याजोगी होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक होते, त्यांचे राजकीय क्षेत्रातील योगदान आणि कार्य यामुळे कुशल संघटक म्हणून ते ओळखले जात असत. लोकांशी असलेला दांडगा संपर्क आणि माणसे जोडण्याची कला यामुळे ते अनेकांच्या मनावर राज्य करत होते. नारायण राणे शिवसेनेत असताना शिवसेना तालुकाप्रमुख व नंतर काँग्रेसचे तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी सावंतवाडी तालुक्याची जबाबदारी पेलली होती. एक सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जायचे. गेली काही वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून ते अलिप्त होते.
गेली काही वर्षे दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या यशवंत वेंगुर्लेकर यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सकाळी कोल्हापूर येथील रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी अस्मिता, दोन मुलगे, भाऊ व भावजय असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी भोम गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत.