You are currently viewing शिवभूपती

शिवभूपती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांची शिव छत्रपतींवर लिहिलेली काव्यरचना*

*!! शिवभूपती !!*

शिवराय छत्रपती झाले
स्वराज्य स्वप्न सत्यात आले
सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर
यशाने तोरण बांधियले ||

परकीयांची दंडेलशाही
स्वकीयांना केले त्राहीत्राही
सारा मुलूख भयाने ग्रस्त
काय करावे कळेना काही ||

माय जिजाऊ करी संस्कार
शौर्य मुठीत मनी अंगार
अन्यायावर वार करण्या
स्वराज्य मंत्राची तलवार ||

एकविचारी एकदिलाचे
मावळे रांगडे जमविले
आई भवानी प्रसन्न होता
हे श्रींचे राज्य प्रत्यक्ष आले ||

माता-भगिनी अभय दिले
स्वधर्मा अखंड आचरिले
धर्मराज्य हे न्यायनीतिचे
सकलासी वंदनीय झाले ||

लोककल्याण न्यायनिष्ठूर
रयतेचा राजा स्वराज्याचा
राष्ट्राभिमान मनामनाचा
मुजरा त्यांना अभिमानाचा ||

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा