राष्ट्रवादी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांची मागणी
झिंरगवाडी भागातील नागरिकांच्या खोपी, झोपड्या आणि मांगराला लावण्यात आलेला ‘स्वच्छता वापर शुल्क’ रद्द करण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करणारे भाजपचे गटनेते माजी नगरसेवक राजू बेग निव्वळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करत आहेत. गेल्या ५ वर्षात त्यांना कधी वॉर्डमधील समस्या दिसल्या नाहीत. सत्तेत असतानाही पाण्यासाठी घागर आंदोलन करायची वेळ गटनेत्यावर आली होती. झिरंगवाडीतला खराब झालेला साधा रस्ता त्यांना सुधारता आला नाही. यातच सर्वकाही स्पष्ट होत असून केवळ निवडणुका समोर ठेऊन राजू बेग स्टंटबाजी करत आहेत. सत्तेत असताना काहीही करू न शकलेल्या राजू बेग यांनी आता जनतेच्या प्रश्नांची काळजी असल्याचा आव आणू नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक देवेंद्र टेंमकर यांनी लगावला आहे.
येथील नागरीकांच्या घरी घंटागाड्याच जात नाहीत. त्यामुळे आकारण्यात येणारा ‘स्वच्छता वापर शुल्क’ चुकीचा आहे असं राजू बेग सांगत आहेत. मुळात, शासनाच्या धोरणानुसारच शहरात स्वच्छता वापर कर आकारण्यात येत आहे. सत्तेत असताना राजू बेग यावर कधी बोलताना दिसले नाही. गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी नगरसेवक असताना देखील कचरा प्रश्न सोडा साधी घंटागाडीची सुविधा नागरिकांनी मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांनीच हे आपल्या निवेदनातून अधोरेखित केले आहे. त्यामुळे सत्तेचा उपभोग घेणाऱ्या राजू बेग यांनी सत्तेत असताना काय केल ? हे जाहिर कराव. रस्ता दुरुस्ती प्रश्न, पाणी प्रश्न हे सोडवू शकले नाही. सत्ताधारी गटनेता असताना देखील पालिकेत जावून घागर बडवायची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे आता निवडणूक जवळ येत आहे याची चाहूल त्यांना लागली आहे. त्यामुळेच नागरिकांचे प्रश्न त्यांना आता दिसू लागले आहेत असा जोरदार हल्लाबोल देवेंद्र टेंमकर यांनी केला आहे.