You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि राजकीय राडे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि राजकीय राडे…

अस्थिर सिंधुदुर्गात पर्यटक येतील का?

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन एक दशक उलटले परंतु जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला म्हणावी तशी चालना मिळाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे हे मनमोहक आहेत, स्वच्छ, सुंदर किनारे म्हणूनही त्यांची ओळख आहे. सूर्यास्त होतानाचे अवर्णनीय दृश्य जर कुठे पहायचे असेल तर ते समुद्रात सूर्याचे मिलन….आणि भोगवे सारख्या समुद्र किनाऱ्यावर हे अवर्णनीय दृश्य पाहण्याची मजा वेगळीच असते. शेजारील गोवा राज्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर आल्हाददायक वातावरण असते, गोव्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तापमान देखील उन्हाळ्यात कमीच असते. परंतु गोव्यामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत नाहीत आणि जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत होणारे राजकीय राडे यामुळे गढूळ झालेले वातावरण पर्यटनासाठी योग्य नसते. त्यामुळे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पाठ फिरवतात.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यानंतर जिल्ह्यात बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची पळवापळवी, आणि अस्थिर,अशांत वातावरण पर्यटनाला साजेसं नाही. छोट्या छोट्या राजकीय घटनांवरून जिल्ह्यात दहशत निर्माण होते, लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक यांना नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत येण्यापासून रोखले जाते, म्हणजे लोकशाहीमध्ये लोकशाहीचाच घोट घेण्यासारखे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार होऊ लागले आहेत. कुडाळमध्ये घडलेला प्रकार हा लाजिरवाना आहे, आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ घडला नाही, सौम्य लाठीमार केल्याबरोबर कार्यकर्ते बाजूला सरकले. अशा राडा संस्कृतीमध्ये जिल्ह्यातील पर्यटन कसे काय वाढीस लागणार?
आजकाल तेज तर्रार झालेल्या सोशल मीडियाच्या दुनियेत अंगणात घडलेली गोष्ट घरच्यांना समजण्याच्या अगोदर सोशल मीडियावरून गावभर पसरते तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले राडे, खून, खुनाचे प्रयत्न, मारामाऱ्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विडिओ, फोटो आदी द्वारे देशात, विदेशात क्षणार्धात पोचतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कितीही सुंदर असला तरी आणि जिल्ह्याचे नैसर्गिक वातावरण आल्हाददायक असले तरी जिल्ह्यातील राजकीय राड्यानी अंतर्गत वातावरण बिघडते आणि ते सर्व जगभर पोचते, त्यामुळे जिल्ह्याचे पर्यटन मागासले आहे. जिल्ह्याचा पर्यटनातून विकास होणार, जिल्हा पर्यटन जिल्हा केला म्हणून कोणीही अभिमानाने सांगितले तरी जिल्ह्यात आम्ही शांतता नांदत ठेवतो असं जोपर्यंत ओरडून ओरडून सांगून लोकांपर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्र कात टाकणार नाही आणि जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही.

 


सात वर्षांपूर्वी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर राज्यात गृहराज्यमंत्री होते, पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतला होता त्यावेळी जिल्ह्यात शांतता होती. राडे संस्कृती जिल्ह्यातून हद्दपार झाली होती. परंतु विरोधकांपेक्षा शिवसेनेतील चौकडीलाच दीपक केसरकर नको होते त्यामुळे पद्धतशीरपणे त्यांना बाजूला केले गेले, दुर्दैवाने केसरकर पुन्हा मंत्री झाले नाहीत आणि तेव्हापासूनच गाडली गेलेली राडा संस्कृती जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढू लागली. केसरकर शांत संयमी होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात होणारे राडे थांबले होते. जिल्ह्यात सध्या रत्नागिरीचे पालकमंत्री असल्याने जिल्हा वाऱ्यावर सोडल्यासारखीच परिस्थिती आहे. शेवटी घरात राहणारा बापच घराला योग्यप्रकारे सांभाळू शकतो, बाजूच्या गावात राहणार्याला घरात काय चाललंय हे समजेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाते. तशीच हालत सिंधुदुर्ग जिल्ह्याची झाल्याने जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला योग्य चालना मिळत नाही. पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी त्या व्यवसायाची दूरदृष्टी असलेला नेता जिल्ह्याचा पालकमंत्री किंवा आमदार हवा, त्याचे राज्याच्या मंत्रिमंडळात वजन पाहिजे. केसरकरांकडे पर्यटन व्यवसाय मार्गावर आणण्याची दूरदृष्टी आहे, ते पर्यटनाला चांगले दिवस आणू शकतात, परंतु शिवसेनेतील चौकडीने त्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूलाच केलं असल्याने त्यांनी कितीही मनात आणले तरी ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची अवस्था बिकट होत चालली आहे आणि नावालाच पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेते जोपर्यंत राजकीय निवडणुका खेळीमेळीने घेऊन लढत नाहीत, राजकीय खेळी म्हणजे लढाया समजत राहतील तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन वाढीस लागणार नाही, पर्यटक जिल्ह्यातील अशांत राजकीय वातावरणामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाकडे कायम पाठ फिरवत राहतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा