*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*
*बुगडी*
शोभा देते ग बुगडी,
कर्णफुले नी वेलाला.
उंच स्थानी कानावर
मान मिळे बुगडीला.
घरंदाज वा श्रमिक,
असो कुणीही ललना.
कानी घालते बुगडी,
छान इवला दागिना.
कधी जिरे मोतीयाचे,
तिला लटकती घोस.
सणावारी आवर्जून,
बुगडीचा मला सोस.
जुन्या बुगडीने आता,
रूप नवे पांघरले.
किती विविध प्रकार,
सोनाराने घडवले.
कानी आजीच्या शोभते
माने सोबत हलते,
रूप सात्वीक वेगळे
तिचे खुलून दिसते.
नात आहे एकुलती,
लाडी आजीच्या मायेची.
साऱ्या मुठी मध्ये मुठ,
दिली बुगडी सोन्याची !
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे.