सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम ; लता दीदींना वाहीली श्रद्धांजली…
वेंगुर्ले
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील महिलांना एकत्रित आणून त्यांना शासकीय योजना व ग्रामपंचायतच्या विविध योजनांची माहिती मिळावी, शिक्षण,पर्यावरण, आरोग्य तसेच स्वच्छता विषयक माहितीची जनजागृती करता यावी, या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गानसम्राज्ञी भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सरपंच मनोज उगवेकर तसेच उपस्थित ग्रामपंचायत महिला सदस्यांकडून दीपप्रज्वलन करून तसेच स्व. लताजी मंगेशकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रोजेक्टर स्क्रीन द्वारे दीदींच्या गाजलेल्या गीतांची ध्वनिफीत लावून लताजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच ग्रामपंचायत माध्यमातून झालेल्या विकास कामांची चित्रफिती द्वारे माहिती प्रसारित करण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना ग्रामपंचायत च्या विविध योजनांची माहिती दिली तसेच सरपंच मनोज उगवेकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्य व स्वच्छता विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिलांना ग्रामपंचायत कडून स्वच्छता साहित्य चे वाटप करून “स्वच्छ शिरोडा सुंदर शिरोडा” साठी सर्वानी एकत्रित येऊन गाव स्वच्छ ,निरोगी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ मयुरी राऊळ, सौ तृप्ती परब , सौ रोहिणी खोबरेकर, सौ प्राची नाईक, सौ समृद्धी धानजी यांनी उपस्थित सर्व महिलां चे स्वागत करून हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ स्वरांगी उगवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी योगिता परब, नीता मुणगेकर व गजानन शिरोडकर, सिद्धेश गावडे, ज्ञानेश्वर मयेकर यांचे सहकार्य लाभले.