You are currently viewing आंगणेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

आंगणेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

*राज्यभरातून मंत्री, राजकीय नेत्यांची असते उपस्थिती….परंतु सुविधांकडे दुर्लक्षच*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडीच्या भराडी देवी म्हणजे नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे आंगणेवाडीची जत्रेसाठी राज्यभरातून भक्तांची मंदियाळी असते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत आंगणेवाडीची जत्रा पार पडते. भराडी देवीच्या दर्शनासाठी तसेच नवस बोलण्यास आणि बोललेले नवस फेडण्यास भक्तगण मोठ्या संख्येने जत्रेला येत असतात. जत्रेचे खास आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते शिवसेना आणि इतर पक्षाचे जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील मंत्री, राजकीय नेते या जत्रोत्सवास आपली हजेरी लावतात. त्यामुळे राज्यात गर्दीचा उच्चांक गाठणारी जत्रा म्हणून आंगणेवाडीच्या जत्रेची ओळख आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्ते गेली दोन वर्षे कात टाकून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, काहींची कामे लोकांची कंबरडी मोडल्यानंतर आणि गाड्यांचे खुळखुळे झाल्यानंतर सुरू झाली आहेत. परंतु आंगणेवाडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची मात्र दुरावस्था झाली आहे. कोव्हीड नियमांमध्ये शिथिलता आल्याने जत्रेला लाखो लोकांची उपस्थिती असणार हे नक्की आहे. आणि लाखोंची उपस्थिती असणाऱ्या जत्रेस हजारो चारचाकी दुचाकी आणि मोठमोठी वाहने येणार हे त्या अनुषंगाने आलेच. दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे अर्धेअधिक नेते, मंत्रिमंडळ सदस्य, इतर पक्षांचे राजकीय नेते आंगणेवाडी जत्रेस आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे येणाऱ्या मंत्री महोदयांना आणि भराडी देवीच्या भक्तांना दुरावस्था झालेल्या रस्त्यानेच आंगणेवाडी जत्रेस नेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मालवण-कुडाळ मतदारसंघाचे आमदार गेले वर्षभर जिल्ह्यातील रस्ते होणार म्हणून सांगत आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणची कामे वगळता रस्त्याच्या कामांमध्ये तेजी दिसत नाही, आणि मार्च महिन्यानंतर कधीही येणारा अवकाळी पाऊस आणि भर मे महिन्यात सुद्धा सुरू असणारा पाऊस यामुळे उशिरा झालेली रस्त्याच्या डांबरीकरणांची कामे पावसात उखडतात, वाहून जातात आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी कंबरमोड व्यायामाचा सामना करावा लागतो तो जिल्ह्यातील जनतेला. आंगणेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे जत्रा तोंडावर आली तरीही काही ठिकाणी हाती न घेतल्याने तर काही अर्धवट असल्याने खड्डेमय रस्त्यांवरून मुख्यमंत्री आणि इतर मंत्री,राजकीय नेते गेल्यावरच जिल्ह्याची प्रगती त्यांना दाखवुनच करणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारीत आहेत. लोकांसाठी नको निदान देवीने तुम्ही केलेले नवस तरी पूर्ण करण्यासाठी रस्ते करा अशी आर्त हाक जनतेतून ऐकू येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा