You are currently viewing व्हॅलेंटाईन डे.

व्हॅलेंटाईन डे.

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.राधिका भांडारकर यांचा ‘व्हॅलेन्टाईन डे’ वर लिहिलेला अप्रतिम लेख

व्हॅलेंटाईन डे ही संकल्पना पाश्चांत्यांची असली तरी ,एक प्रेम दिवस म्हणून त्याचं महत्व वैश्विक आहे.प्रेम ,प्रेमिक,
शृंगार ,प्रणय हे मानवी जीवनाचेच भाव विश्व आहे.
स्त्री पुरुषांच्या नात्यातला तो एक भावपूर्ण बंध आहे.
मग सहजच कवी बींच्या काव्यपंक्ती आठवतात,
।।हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण
ऊणे करु आपण दोघे जण
जन विषयाचे कीडे यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे…..।।

असा शुद्ध प्रेमाचा संदेश देणारा ,या दृष्टीकोनांतून आपण
या व्हॅलेंटाईन डे चा सोहळा करुया..
तिसर्‍या शतकाच्या सुमारास रोम मधे क्लाउडीयस नामक राजा होता.त्याने ,सैन्यात भरती होणार्‍यांनी
लग्न न करण्याचा आदेश काढला होता.तरीही व्हॅलेंटाईन
हा पादरी (priest) सैनीकांची गुपचुप लग्न लावून द्यायचा.हे राजाला कळल्यावर त्याने व्हॅलेंटाईनला
देशद्रोही म्हणून अटक केली आणि त्यास फाशीची शिक्षा ठोठावली.तेव्हांपासून तेथील प्रेमी युवक व्हँलेॅटाईन या
व्यक्तीच्या नावाने हा दिवस साजरा करत आहेत..
वास्तविक हा बलीदान दिवस आहे .तारीख होती १४
फेब्रुवारी .म्हणून दर वर्षी हा दिवस १४फेब्रुवारीलाच साजरा केला जातो.आणि या सणाच्या साजरेपणातली
मूळ कल्पना ही शुद्ध प्रेमाचीच आहे.
मात्र आपल्या संस्कृती रक्षकांनी टीकेचा भडीमार
या व्हॅलेंटाईन डे वर केला.त्यांच्या मते युवापीढीचे
राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा दिवस म्हणजे व्हॅलंटाईन डे! तो साजरा करणे म्हणजे नीतीहीनतेचे अनुकरण.
आणि हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन!!!
वास्तविक हिंदु संस्कृती ही सर्वधर्म समावेशक आहे.
सर्व धर्मातल्या रीतीभातींकडे सहिष्णुतेने पाहणारी आपली संस्कृती आहे…ती इतकीही लेचीपेची नाही की
केवळ अनुकरणापायी तिचा र्‍हास होईल.
वास्तविक होळी हाही एकप्रकारचा प्रेम दिवसच आहे.
मनातील जळमटं.,किल्मीषं, कडवटपणाला अग्नी देउन प्रेमभावनेला ऊजाळा देणाराच तो दिवस आहे.
एक रंगाचा दिवस.एकमेकांवर रंग उडवून प्रेमानंद साजरा करण्याचा दिवस.राधा कृष्णाच्या प्रेमरंगाचीच आठवण.
आता ग्लोबलायझेशन झाले.तांत्रिक विकासाने जग
जवळ आले.खर्‍या अर्थाने विश्व एक कुटुंब बनले.
मग सणांची ,सोहळ्यांची आनंदी संकेतांची देवाण घेवाण मुक्तपणे होण्यास संकुचीत विचारांचे अडसर कशाला?
शेवटी मर्यादा पाळणं, स्वैराचार ,अनाचार टाळणं,शुद्धता राखणं,हे व्यक्तीसापेक्षच आहे.
म्हणूनच १४ फेब्रुवारीच्या ,वैश्विक प्रेमाचा संदेश देणार्‍या
व्हॅलेंटाईन डे चं आनंदाने स्वागत करुया….
त्याचा थोडा विस्तार करुया वाटल्यास…फक्त युवा प्रेमींपुरताच मर्यादित न ठेवता ,सारीच प्रेममय नाती
जपण्याचा,व्यक्त होण्याचा संकल्प करुया…
देऊया ,या ह्रदयीचे त्या ह्रदयाला…
सारेच करुया शुद्ध रसपान…..!!!

सौ. राधिका भांडारकर
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा