You are currently viewing नामस्मरण व विश्वप्रार्थना यामधील फरक काय?

नामस्मरण व विश्वप्रार्थना यामधील फरक काय?

✅उत्तर : *तत्त्वत: नामस्मरण व विश्वप्रार्थना या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही कारण दोन्ही मध्ये ईश्वर स्मरण हेच अभिप्रेत आहे.*

विश्वप्रार्थनेची सुरुवात व शेवट ईश्वर स्मरणानेच होते.

*परंतु परिणामकता साधण्याच्या दृष्टीने दोन्हीमधील फरक सांगता येईल.तो फरक खालीलप्रमाणे-*

🎯१) *विश्वप्रार्थनेत नामस्मरण आहे,परंतु नामस्मरणात विश्वप्रार्थना नाही.*

🎯२) *नामस्मरण प्रत्येक व्यक्ती व्यक्तीश:स्वत:च्या हितासाठी करीत असते.त्याच्या उलट विश्वप्रार्थनेत प्रार्थना करणारा परमेश्वराकडे स्वत:साठी न मागता जगातील सर्व लोकांसाठी “त्यांचे हित व्हावे,कल्याण व्हावे,भले व्हावे’असे मागत असतो.*

🎯३) *पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा लोक अपवाद वगळता नामस्मरण करीत नाहीत असा संतांचा अनुभव आहे.याच्या उलट विश्वप्रार्थनेचे महत्त्व अपवाद वगळता लोकांना लवकर पटते व ते विश्वप्रार्थना म्हणण्यास त्वरीत प्रवृत्त होतात,असा आमचा अनुभव आहे.*

🎯४) *नामस्मरणाचे फळ मिळायला सामान्यपणे बराच अवधी लागतो त्याच्या उलट विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे व मनापासून म्हटल्यास,अपवाद सोडल्यास,सहा महिन्यात फळ मिळते असा अनेक लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.*

🎯५) *सर्वसाधारणपणे नामस्मरणात विशिष्ट धर्म व विशिष्ट संस्कृती यांचा संबंध येतो.त्यामुळे त्याला धर्म,पंथ,संप्रदाय अशा संकुचितपणाचा स्पर्श होतो.याच्या उलट विश्वप्रार्थना विश्वातील यच्चयावत् सर्व लोकांसाठी असल्यामुळे व ती हृदयस्थ ईश्वराला उद्देशून असल्यामुळे,तसेच सर्वांतील सर्वेश्वराच्या अनुसंधानात केल्यामुळे विश्वप्रार्थनेला सर्वव्यापकतेचा स्पर्श होतो.*

🎯६) *नामस्मरण मोक्ष मिळण्यासाठी केले जाते,याच्या उलट विश्वप्रार्थना विश्वकल्याणासाठी केली जाते.*

🎯७) *नामस्मरणाच्याद्वारे व्यक्तीच्या जीवनात क्रांती किंव परिवर्तन होणे शक्य आहे.याच्या उलट विश्वप्रार्थनेच्या द्वारे अखिल मानवजातीच्या जीवनात क्रांती किंवा परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे.*

🎯८) *नामस्मरणाला देवाच्या मूर्तीचे किंवा देवाच्या प्रतिमेच अधिष्ठान असते,याच्या उलट विश्वप्रार्थनेला विश्वरूप सर्वेश्वराच्या निसर्ग नियमांचे अधिष्ठान आहे.*

🎯९) *सामान्यपणे सामान्य साधकांना नामस्मरणाचा अर्थबोध न झाल्याने ते रुक्ष होऊन त्याचा कंटाळा येण्याची दाट शक्यता असते.त्याच्या उलट विश्वप्रार्थनेतील शब्दबोध साधकाला सहज होतो व त्यात रमणे व तलीन होणे सोपे जाते.*

🎯१०) *“मी आणि माझेपण’ ह्याचा लोप विश्वप्रार्थनेत सहज आहे तसा तो नामस्मरणात सहज होत नाही.*

🎯११) *नामस्मरण करणारा साधक मोक्षाच्या पाठीमागे धावतो,याच्या उलट मोक्षच विश्वप्रार्थना म्हणणाऱ्याच्या पाठी धावतो.*

🎯१२) *नाम हा मंत्र आहे तर विश्वप्रार्थना हा महामंत्र आहे.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.

प्रतिक्रिया व्यक्त करा