You are currently viewing गान कोकिळा मूक झाली..

गान कोकिळा मूक झाली..

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.राधिका भांडारकर यांचा भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेला अप्रतिम लेख

वसंत ऋतु कोकीळेचा सूर घेउन दिमाखात येतो..
पण हा वसंत कसा फुलेल सूराविना…
लताच्या निधनाने मन नि:शब्द ..स्तब्ध झाले…
सत्यं शिवं सुंदरम् !!
मृत्यु हेही एक सत्यच…आणि लताच्या असंख्य चाहत्यांनी ते कसे पचवावे…?
मनावर गारुड घालणारा, मंत्रमुग्ध करणारा तो
दैवी सूर हरपला असे तरी कसे म्हणणार..
तो अमर आहे..तो रसिकांच्या मनात सतत रुंजी घालत राहणार…
एक युग संपलं..
एकच सूर्य ,एकच चंद्र एकच लता हेच सत्य…
भारत रत्न लता..
गानसम्राज्ञी लता..
संगीतसृष्टीतला मुकुट लता..
शान भारताची..
आवाज भारताचा..
सदा बहार ..सदा तरुण..

ॐ नैनं छिन्दन्ती शस्त्राणि।
नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो।
न शोषयति मारुत:।।
लतादीदींचा सूर असाच अमर आहे…
शतकातून असा एखादाच कलाकार जन्माला येतो..
माणूस म्हणून त्यांचं व्यक्तीमत्व भारावून टाकणारं होतं..
१९२९ ते २०२२ हा त्यांचा जीवनकाल..
जवळजवळ सहा दशके त्यांनी त्यांच्या सूरांनी
राज्य केले..अनेक पिढ्यांना आनंद दिला..
त्या सूराला कुठला मजहब नव्हता.धर्म नव्हता.
वंश वर्ण जात नव्हती …तो फक्त इश्वराचा सूर होता…
त्यांनी चित्रपट विश्वातील स्थित्यंतरे पाहिली.
पण चित्रपटाच्या पल्याड ,भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत हे त्यांचं
स्वप्नं होतं…
२८ सप्टेंबर १९२९ हा त्यांचा जन्मदिन.
मास्टर दीनानाथ मंगेशकर या महान नाट्य गीत
गायकाची ज्येष्ठ कन्या..
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलात…
हा कल्पवृक्ष खरोखरच लतादीदींच्या गाण्याने बहरला ..फुलला..विस्तारला…
३६ हून अधिक भाषांमधून त्या गायल्या..
अनेक रस रंग अभिनयाची गाणी त्यांच्या कंठातून रुणझुणली…त्यांच्या गायनातून
शब्द भाव अक्षरश: ऊर्जीत होत…
अनिल विश्वास,शंकर जयकिशन,एस डी बर्मन
सलील चौधरी ,सी रामचंद्र ए आर रहेमान, सुधीर फडके..
अशा अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले…तीस हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली..
आनंदघन या माध्यमातून त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले.साधी माणसं या मराठी चित्रपटातली त्यांची गाणी अत्यंत गाजली.आजही अगदी आजची संगीतप्रेमी मुलं त्यांची गाणी
अभ्यासून गातात..
पार्श्वगायिका ही त्यांची जागतिक ओळख असली तरी त्यांनी १९४२ साली एका चित्रपटात लहानशी भूमिकाही केली होती..
लता मंगेशकर म्हणजे सात लखलखती अक्षरे.
या सप्त सूरांची जादू किती खोलवर रुजलेली आहे..
प्रेमस्वरुप आई.. हे माधव ज्युलीअनचं गीत
लताने भावभावनांसहित मूर्तीमंत ऊभे केले आहे..त्यातील शेवटच्या ओळी ,घे जन्म तू फिरोनी येईन मी पोटी..या शब्दातली हताशता व्याकुळता त्यांच्या गाण्यातून तितक्याच तीव्रतेने जाणवते..शब्दोच्चार, त्यातला लगाव यातलं
विलक्षण मिश्रण त्यांच्या गाण्यात जाणवतं.
त्यामुळेच त्यांच्या गाण्याशी, आवाजाशी
कुणाची तुलनाच होऊ शकत नाही…

 

जरासी आहट होती है
तो दिल सोचता है
कही ये वो तो नही
कही ये वो तो नही…
कारुण्याने आणि भावनाने ओथंबलेले हे लतादीदींचे सूर जेव्हांजेव्हां कानावर पडतात
तेव्हा तेव्हा देहावर कंपने जाणवतात…

लता एक महासागर आहे…असंख्य स्वर मोत्यांचा..वेचता किती वेचावा..

आताही ऐकू येते..

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी
मणी ओढता ओढता
होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हासवे….

सर्वांची दीदी..संगीतक्षेत्राची वात्सल्यसिंधु आई..
गानसम्राज्ञी..क्वीन आॅफ मेलडी .आणि एक समाजाभिमुख व्यक्तीमत्व..अनंतात
विलीन झाली..एका स्वरयुगाची समाप्ती झाली..
शब्दातीत कालातीत आहे सारंच…
प्र के अत्रे यांच्याच शब्दात
“लताच्या कंठातील कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर,त्यासाठी प्रभात काळची कोवळी सूर्यकिरणे,दवबिंदुत भिजवून केलेल्या शाईनं,कमलतंतूंच्या लेखणीने आणि वायुलहरीच्या हलक्या हाताने,फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र,गुलाबकळीच्या
करंड्यातून तिलाअर्पण करायला हवं…”

या पंचमाला भावपूर्ण
अल्वीदा….
लतादीदी तुमच्याच स्वर गंगेच्या किनार्‍यावरुन
तुम्हाला ही मानवंदना….!!

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा