ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित सामाजिक चातुर्मास-२०२१ चा संदर्भ ग्रंथ समाजाला दिशादर्शक ठरेल असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले.
सामाजिक चातुर्मास-२०२१ चा संदर्भग्रंथ तयार करण्यासंदर्भात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी आणि कोकण विभाग पदाधिकारी यांची ऑनलाईन बैठक डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोरोना महामारी काळातही ग्राहक पंचायत महाराष्ट्रने (ऑनलाईन) आभासी पद्धतीने ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या संकल्पनेप्रमाणे चातुर्मास कार्यक्रम घेण्यात आला. या चातुर्मास कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातील, विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या अनमोल चातुर्मासाचा संदर्भग्रंथ लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी ग्वाही ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी दिली.
*ऑनलाइन चातुर्मास ग्रंथ हा पुढची पंचवीस वर्षे प्रशासनात, सामाजिक क्षेत्रात व कार्यकर्त्यांकरीता मार्गदर्शक/ ललामभूत व देखणा ठरेल, असा विश्वास डॉ.लाड यांनी राज्य कार्यकारणी व कोकण विभाग कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांच्या ऑनलाईन बैठकीत केला.*
या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी व विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.लाड यांनी पदाधिका-र्यांशी संवाद साधून ऑनलाईन चातुर्मास-२०२१ संदर्भ ग्रंथाचे महत्त्व अधोरेखीत केले.
संदर्भग्रंथ विचार रूपाने घरोघरी पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी राज्य कार्यकारणीचे सचिव श्री.अरुण वाघमारे, सहसंघटक सौ.मेधाताई कुलकर्णी, सदस्य श्री. प्रमोद कुलकर्णी, डॉ.अजय सोनवणे व प्रा.श्री.एस.एन.पाटील उपस्थित होते. राज्य सहसंघटक मेधाताई कुलकर्णी यांनी ग्रंथाचे स्वरूप कसे असणार, त्यात कुठल्या बाबी समाविष्ट राहतील याविषयी मार्गदर्शन केले, तर राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी आर्थिक नियोजन करण्याकरीता विविध शंकांचे निरसन केले. १५ मार्च ‘जागतिक ग्राहक दिनी’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशन करण्याचे ठरले असून सर्वांनी यथाशक्ति सहकार्य करण्याचे आवाहन कोकण विभागाच्यावतीने करण्यात आले.
या बैठकीला कोकण विभागातून श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर, प्रणिता वैराळ,दिनेश बैरीशेट्टी, नवीन पांचाळ आदी उपस्थित होते.