संपूर्ण कलाविश्वावर शोककळा
विशेष संपादकीय…..
भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेले २८ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कोरोनावर त्यांनी मात केली होती. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांची कृत्रिम यंत्रणा काढण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते, अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला होता. पंडित दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लतादीदी या भावंडात सर्वात मोठ्या. आशा, उषा,मीना, ह्रदयनाथ ही छोटी भावंडे असून ती देखील संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी स्वतःला संगीतासाठी वाहून घेतले होते. लता मंगेशकर यांनी त्यांची कारकीर्द१९४२ मध्ये सुरू केली होती. ९०० पेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांची तर २० पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची गाणी गायली आहेत.
लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कला क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान लतादीदींच्या जाण्याने झाले आहे. *लता मंगेशकर यांना संवाद मिडियाकडून भावपूर्ण आदरांजली…*