“ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस” तर्फे मनोज वालावलकर यांनी मुंबईत भेट घेऊन मांडल्या वाहतूकदारांच्या व्यथा
आज मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितिन गडकरी यांची ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टच्या श्री मनोज वालावलकर यांनी भेट घेतली. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधून चर्चा केली. त्या संबंधी निवेदनही सादर केले. कोकणवर माझा लक्ष असून त्याची काळजी अजिबात करू नये, चुकीच्या पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराना बदलून त्यांच्यावर गरजेनुसार कारवाई करण्यात येईल. लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नितीन गडकरी यांनी वालावलकर यांना सांगितले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की आपल्या प्रयत्नाने गेली कित्येक दशके रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम मंजूर झाले, परंतु मागील अनेक वर्षे हे काम अडखळत चालले आहे. दळणवळणासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने त्याचा दुष्परिणाम वाहतुकीच्या दरावर आणि साहजिकच कोकणच्या विकासावर होत आहे. मुख्यत्वेकरून राजापूर, लांजा ते निवळी फाटा, संगमेश्वर ते खेड पुढे महाड,कणकवली शहर डागडुजी चाललेले बॉक्सवेल हा मार्ग धोक्याचा व त्रासदायक आहे. तात्पुरत्या स्वरूपात सदर वाहतुकीचा रस्ता, वळणे व्यवस्थित करण्याची गरज आहे. कुडाळ शहरात उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. हे एकूणच काम पूर्ण होईपर्यंत गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुणे महामार्गावर टोलमाफी मिळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गडकरी यांनी या निवेदनात स्वतः लक्ष घालून सकारात्मक पाऊल लवकरात लवकर उचलले जाईल, असे यावेळी बोलताना सांगितले.