गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची स्पष्टोक्ती
सावंतवाडी
काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पून्हा उभारी घेण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरवून पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हा संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या निवास्थानी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस राजु मसुरकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,शहर अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, उपतालुकाध्यक्ष समिर वंजारी, महीला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, विभावरी सुकी, विजय कदम, अभय शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मधल्या काळात काँग्रेसला काही वाईट दिवस आले हे सत्य आहे. परंतु राजकारणात प्रत्येक पक्षाला यातून जावे लागते. अलीकडेच नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही संचालक म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू उत्पन्नातून मिळणाऱ्या बोंडूवर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास राज्य सरकार त्याला निश्चितच मदत करेल असे प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू असे मत त्यांनी मांडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महा विकास आघाडी म्हणून काम करत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्या बाबतचा तक्रारी आपल्या कानावर आल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्याचा समन्वयक म्हणून आपण काम करणार असून महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन जाण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला योग्य ते झुकते माप देण्या बाबत आपला प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले.