जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांनी मराठी चित्रपट अभिनेते कै.रमेश देव यांच्यावर लिहिलेली काव्यरचना
कर्तृत्वाला नव्हती सीमा,सीमेतच राहिला
मायावी या दुनिये मध्ये देव आम्ही पाहिला..
मराठमोळे रूप गोजिरे अभिनयात “भिष्म”
करू कोणती भुमिका त्याला पडला नाही प्रश्न?
नायक खलनायक गुंड, प्रेमिक कधी देखणा
रंगमंचही झाला पहा ना त्याच्या वाचून सुना
सुसंस्कृत नि सभ्यपणाची खानदानी वृत्ती
अजाणताही कधी न घडली आक्षेपार्ह कृती…
काही ही येवो वाट्याला करत राहिला सोने
दशके लोटली पडद्यावरती जिंकत गेला मने
भाऊ वाटला सखा वाटला प्रियकरही कोणाला
“सीमा”ओलांडून कधी ही टोचला ना कोणाला…
छोटी असो वा भुमिका मोठी ठसा अमिट राहिला
दुष्टाव्याच्या दुनिये मध्ये “ देव”बनून राहिला
आदर्शाचे मापदंड हे असती पहा दुर्मिळ
गांभिर्याने सदा राहिला केला नाही खेळ …..
मनामनातून सदाच राहिल छबी रमा ईशा
उजळून गेला बदनामीचा असे जरी पेशा
साथ मिळाली भार्येची ही पहा तुला अनोखी
वरती जाऊन मिरवशिल तू पहा तिची शेखी….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३ फेब्रुवारी २०२२
वेळ : सकाळी ९:२९