जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश लागू
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठीचे नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पा, उपहारगृहे, वॉटरपार्क, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा असणार नाही. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काल रात्री काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे.राज्यात कोवीड 19 (ओमिक्रोन ) विषाणूचा प्रसार होण्यामध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रसार व प्रादुर्भाव यांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने दि. 31 जानेवारी 2022 रोजी नवीन आदेश जारी केलेले आहेत.
त्याअर्थी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या एकूण लोकसंख्येच्या 99.84 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून 81.95 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कोविड 19 ओमिक्रोन विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध ( प्रतिबंध ) करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता देऊन पुढीलप्रमाणे आदेश लागू केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे – ऑनलाईन तिकीट वितरीत करणारी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे त्यांच्या नियमित वेळेनुसार खुली राहतील. पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. पर्यटकांनी कोवीड अनुरूप वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा आस्थापना यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशाप्रमाणे दंड करण्यात येईल.
स्पा – 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. येथे येणाऱ्या सर्व नागरिकांनी व सेवा देणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील व मास्क काढावा लागेल अशा सेवा पुरविता येणार नाही. सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
अंत्यसंस्कार – अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा असणार नाही.
समुद्र किनारे, बागा, उद्याने – सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत चालू राहतील. सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. पर्यटकांनी कोवीड अनुरूप वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा आस्थापना यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशाप्रमाणे दंड करण्यात येईल.
जलतरण तलाव, वॉटर पार्क – 50 टक्के क्षमतेने चालू राहतील, सर्व ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. येथे येणाऱ्या सर्व नागरिकांनी व सेवा देणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
रेस्टॉरंट्स, उपहारगृहे – जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, उपहारगृहे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व आंगतुक / नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच रेस्टॉरंट्स, उपहारगृहामध्ये परवानगी देण्यात येईल. रेस्टॉरंट्स, उपहारगृहे दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. दररोज होम डिलीव्हरीला परवानगी असेल.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे – जिल्ह्यातील सर्व नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व आगंतुक / नागरिकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच नाट्यगृहे, चित्रपटगृहामध्ये परवानगी देण्यात येईल. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
भजने, इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम – सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के एवढ्या लोकांना परवानगी असेल.
लग्नसमारंभ – बंदिस्त सभागृहामध्ये जास्तीत जास्त 200 लोकांना परवानगी असेल. मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 200 किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढ्या व्यक्तींना परवानगी असेल.
या सर्व बाबींमध्ये दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशांमध्ये नमुद कोविड अनुरुप वर्तणुकीसंबंधीच्या नमुद केलेल्या नियमांचे अनिवार्यपणे पालन करण्यात यावे आणि त्यांचे उल्लंघन केल्यास त्या आदेशामध्ये नमुद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती करण्यात येईल. तसेच वरील नमुद केल्या व्यतिरिक्त दि. 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशांमधील इतर सर्व निर्बंध कायम राहतील.