खाकीच्या संबंधित यंत्रणेने मागितले आगाऊ पैसे
जुगार, मटका सारखे अनैतिक धंदे म्हणजेच जिल्ह्याची अर्थव्यवस्था असल्यासारखे अनैतिक अनधिकृत धंद्यांना खाकीकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याच अनधिकृत धंद्यांच्या जोरावर अनेक खाकी रखवालदारांच्या हौस,मौजमजा, आणि चैन भागत असते. अनेक खाकी वर्दीवाल्यांचे बँकेचे हफ्ते सुद्धा बाहेरच्या बाहेर मिळणाऱ्या चिरीमिरी मधूनच जात असतात. त्यामुळे जिल्ह्यातील जुगाऱ्यांची सुद्धा चांदी झाली आहे.
मालवण कट्टा येथे चार दिवसानंतर जुगाराची मैफिल सजणार आहे. सिनेमा तिकिटांची जशी आगाऊ तिकीट विक्री होते तशी आता जुगाऱ्यांची आणि खाकीच्या संबंधित यंत्रणेची बैठक होऊन त्यात जुगाराचे फड लावण्यासाठी बोलणी होतात. मालवण येथे होणाऱ्या बैठकीचे खाकीच्या संबंधित यंत्रणेने आगाऊ पैसे मागितले असून पैसे दिल्याने कोणालाही कळता नये अशी सूचना वजा ताकीद दिलेली आहे. आम्ही येणार तेव्हा आधी कळवणार, कारवाई होणार नाही अशी खात्री खाकीच्या संबंधित यंत्रणेने दिली आहे.
निवती येथील खाकीच्या आशीर्वादाने तेंडोली येथे जुगाराची बैठक सुरू असून कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि माणगाव खोऱ्यात जत्रेत मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या मैफिली सजवल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.