You are currently viewing महोदय पर्वणी निमित्त देवदेवतांनी लुटला समुद्र स्नानाचा आनंद 

महोदय पर्वणी निमित्त देवदेवतांनी लुटला समुद्र स्नानाचा आनंद 

दांडी मोरेश्वर किनाऱ्यावर फुलला भक्तीचा मेळा

मालवण

सोमवती अमवास्येच्या निमित्ताने आलेल्या महोदय पर्वणीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध गावच्या देवदेवतांनी मालवण दांडी येथील मोरेश्वर किनाऱ्यावर समुद्रस्नान केले. यावेळी बहुसंख्य भाविकांनी देखील या पर्वणीनिमित्त समुद्रस्नान केले. भक्तिमय वातावरणात महोदय पर्वणीचा सोहळा संपन्न झाला.

सोमवती अमावस्येला येणाऱ्या महोदय पर्वणीनिमित्त काल सोमवारी रात्री पासून मालवणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावातील ग्रामदेवता व देवता पालखीत विराजमान होऊन तरंग, मानकरी व ग्रामस्थांच्या लवाजम्यासह पायी चालत आणि ढोल ताशांच्या गजरात मालवणात दाखल झाल्या. या देवतांचे मालवणवासीयांनी ठिकठिकाणी स्वागत व आदरातिथ्य केले. या देवांच्या व भाविकांच्या वस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोय उपलब्ध करून दिली होती. रात्री देव जागरण,भजन, नामस्मरण आदि कार्यक्रम झाले. तर काही देवता आज सकाळी समुद्र स्नाना साठी मालवणात दाखल झाले. मालवणातील नागरिकांनी सड़ा- रांगोळी घालून, गुढ्या- तोरणे उभारून ठीकठिकाणी देवतांचे स्वागत केले.

दांडी – वायरी येथील मोरयाचा धोंडा या तीर्थस्थानावर म्हणजेच मोरेश्वर किनाऱ्यावर आज सोमवती अमवास्या व महोदय-पर्वणी निमित्त सकाळपासूनच देवतांचा लवाजमा ढोल, ताशा, पालखी, तरंग, घेवून मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री समुद्र स्नाना साठी निघाला. जिल्हाभरातील भक्तांनी आपल्या ग्रामदेवतेसह समुद्र स्नानाचा लाभ घेतला. मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्र ते श्री देव दांडेश्वर हा समुद्र किनारपट्टीचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. तर काही गावच्या देवतांनी कोळंब – सर्जेकोट येथील समुद्र किनारी महोदय पर्वणी निमित्त स्नान केले. तेथेही भक्तांची गर्दी दिसून आली. कोरोनाचे सावट असले तरीही हा सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पर्वणीनिमित्त तालुक्यातील आंबडोस येथील विठलाई, साळेल येथील गिरोबा, सोनवडे येथील रवळनाथ, अणाव येथील स्वयंभू रामेश्‍वर, कसाल येथील रवळनाथ पावणाई या देवता तरंग तसेच आपल्या लवाजम्यासह दाखल झाल्या होत्या. तालुक्यातील कोळंब येथील सोमवती बीच समुद्रकिनारी कांदळगाव येथील रामेश्‍वर तर रेवंडी येथील श्रीदेवी भद्रकाली तरंग, लवाजम्यासह सकाळी दाखल झाले. ढोल-ताशांच्या गजरात देवता समुद्रकिनारी दाखल होत होत्या. कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्‍वर व रेवंडी येथील भद्रकाली देवी सोबत आलेल्या भाविकांनी कोळंब येथील सोमवती बीच समुद्रात देवतांसोबत स्नान केले. याठिकाणीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nine =