*’तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणत अधिकारी खुशहाल*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण परिक्षेत्रातील कर्ली नदीतून मोठया प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. शासनाने रॉयल्टी वाढवल्यापासून वाळूचे टेंडर घेण्यास कोणीच उत्सुक नसतात, तसेच गेल्या वर्षभरात वाळूचे टेंडरही काढलेले नाही, आणि चोरटी काढलेली वाळू अधिकारी वर्गाचे भागवून कमी दरात ग्राहकांना देता येते कारण रॉयल्टी भरावी लागत नसल्याने बक्कळ पैसा कमवता येतो. त्यामुळे वाळू लिलाव न होता चोरटा वाळू उपसा आणि वाहतूक जोरदार सुरू असून वाळू वाहतूक करणारे डंपर मालक दादागिरीच्या जोरावर बिनधास्तपणे वाहतूक करत आहेत.
जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमधून पोलीस देखील वसुली करत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी मात्र त्यापासून अनभिज्ञ असतात, त्यामुळे वाळूच्या डंपर कडून वसुली करणाऱ्या पोलिसांची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. शासनाचा महसूल बुडविण्याच्या कार्यात पोलिसांबरोबर महसुलचे अधिकारी देखील सामील आहेत. महसुलचे अधिकारी, तलाठी, सर्कल गस्त घालत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो डंपर वाळू दरदिवशी गोव्यात कशी काय जाते? हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे अनधिकृत वाळू वाहतुकीमध्ये महसुलचे कर्मचारी, अधिकारी देखील सामील असल्याचा संशय बळावतो. जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून कारवाई करणे आवश्यक आहे.
अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक करणारे डंपर मालक 30 लाखांच्या आलिशान कार मधून पेट्रोलिंग करतात आणि रस्ता क्लिअर असल्याचे संदेश त्यांच्या यंत्रणेला देतात, त्यानंतरच वाळूने भरलेल्या गाड्यांचा ताफा भरधाव वेगाने गोवा व उर्वरित ठिकाणी जाण्यासाठी सुटतो. लाख लाख रुपयांचे मोबाईल वापरणारे वाळू माफिया दिवसाला लाखो रुपये कमावतात. बांदा पोलीस निरीक्षक हे कार्यक्षम अधिकारी आहेत, परंतु इन्सुली पोलीस चेकपोष्टवर होमगार्ड का ठेवले जातात? हा प्रश्न मात्र न सुटणारा आहे. जिथून चोरटी वाळू, चोरटी दारू वाहतूक होते तिथेच पोलीस न उभे राहता होमगार्ड उभे राहिल्याने माफिया निर्धास्त होतात. बांदा पोलीस निरीक्षकांनी याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे.