सोशल मिडीयाचा वापर आजकाल तरुण मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच करू लागले आणि त्यातून अनेक मजेशीर किस्से घडत असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. शाळा कॉलेजची मुले एकमेकांच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियांकडे पाहणारी त्यांचीच मित्रमंडळी असतात, आणि मुलांचे उद्योग म्हणून त्याकडे दुर्लक्ष देखील केला जातो. परंतु सोशल मीडियावर सौन्दर्यवतींच्या फोटोवर सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी किंवा एखाद्या संस्थेच्या जबाबदार व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेत “लक्षवेधी प्रतिक्रिया” ठरते.
स्त्री ही सौंदर्याची खाण असतेच, आणि त्यात जर ती सोशल मीडियावर असेल तर अनेकांना तिच्याशी मैत्री करण्याचा मोह आवरत नाही. अशावेळी एखाद्या स्त्रीने सौंदर्याने नटलेल्या प्रेक्षणीय ठिकाणी फोटो काढून तो फेसबुकवर पोष्ट केला तर त्यावर एकापेक्षा एक सरस प्रतिक्रिया येतात, काही लाईक करतात तर काही प्रतिक्रिया देताना हात आवरता घेतात….अशातच काहींचे कॉलेज मधील जीवन आणि ते दिवस पुन्हा नव्याने जागे होतात आणि मग स्वतःचे भान हरपून कुठे लिहितो? काय लिहितो?….अगदी आपण कोण? हे देखील विसरून सौंदर्याची अशी काय तुलना करतात की वाचणाऱ्यांनाही लाजवतात…सोशल मीडिया हे जगभर क्षणात पोचणारे माध्यम आणि त्यामुळेच त्यांच्या प्रतिक्रिया क्षणात हजारो लोक वाचतात आणि त्या माणसाचा भूतकाळ भविष्यकाळाशी तोलायला लागतात.
मनोरंजन…आणि गरज या दुहेरी हेतूने सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप्प, इन्स्टाग्राम आदींचा वापर सर्रास लोक करतात, परंतु त्यातून मात्र काहीजण आपले गुण दाखवतात आणि हास्याची जत्रा भरवतात हे मात्र खरे…