वैभववाडी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार उच्चशिक्षणातील शैक्षणिक बदल महत्त्वाचे आहेत. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून नवीन शैक्षणिक धोरण समाज हिताचे असून आपण सर्वांनी त्याला सामोरे गेले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.डी.टी. शिर्के यांनी केले.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘भारताच्या जडणघडणीतील ७५ वर्षे- चळवळी व विकासाचे प्रवाह (१९४७-२०२१) या विषयावर आंतरविद्याशाखीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद-२०२२ शुक्रवार दिनांक २८ जानेवारी, २०२२ रोजी प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डी.टी.शिर्के, डॉ.किशोर गायकवाड (इतिहास व मानववंश विज्ञान विभाग, मिझोराम विद्यापीठ), मा.भुजंगराव बोबडे (संचालक, हस्तलिखित संशोधन विभाग दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र, हैद्राबाद) व डॉ.प्राजक्ती वाघ-भोसले (राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वळूज,औरंगाबाद) तसेच संस्थेचे सहसचिव मा.श्री.शैलेंद्र रावराणे, उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, इतिहास विभाग प्रमुख व परिषद समन्वयक प्रा.श्री.एस.एन.पाटील व IQAC समन्वयक डॉ.डी.एम.सिरसट, प्राध्यापक, संशोधक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
सुरुवातीला राष्ट्रीय परिषद समन्वयक प्रा.एस.एन. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. सन १९९२ मध्ये स्थापन झालेल्या महाविद्यालयाने आजपर्यंत केलेल्या वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी विशद केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याबरोबरच प्राध्यापक, संशोधक यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इतिहास विभाग व IQAC विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेला संस्थेचे सहसचिव श्री.शैलेंद्र रावराणे यांनी संस्थेच्यावतीने आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी ‘उच्चशिक्षणातील शैक्षणिक बदल’ या विषयावर मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी भारतातील शिक्षण पद्धती आणि काळानुरूप होत गेलेला शिक्षणातील बदल स्पष्ट केला. सुरुवातीच्या काळात संख्यात्मक वाढीवर आणि त्यानंतर गुणवत्ता वाढीवर भर देण्यात आला होता. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून सर्वांनी त्याचे स्वागत केले पाहिजे असे सांगितले.
‘भारतीय राष्ट्रवादाचे आकलन : स्वातंत्र्य आंदोलन व वर्तमान प्रस्तुतता’ या विषयावर डॉ.किशोर गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना असून राष्ट्रवाद व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे. युरोपातील राष्ट्रवाद संकल्पना आणि भारतातील राष्ट्रवाद संकल्पना यामध्ये फरक आहे. भारतात ब्रिटिश काळात विकास पावलेला राष्ट्रवाद राष्ट्रीय आंदोलनास कारणीभूत ठरुन भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु भारताच्या अमृत महोत्सवी वर्षातही भाषिक, धार्मिक, प्रादेशिक व जातीयता ह्या समस्या आजही आहेत. या समस्या नष्ट झाल्या तरच खऱ्या आधुनिक राष्ट्रवाद निर्माण होण्यास मदत होईल असे सांगितले.
‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील देशासमोरील आव्हाने आणि तरूणाईची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना मा.भुजंगराव बोबडे म्हणाले, पुस्तक वाचता वाचता माणसं वाचायला शिकलं पाहिजे.
माणसाला जगण्यासाठी हवा, पाणी व अन्न या मूलभूत गरजा असून संवाद आणि शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज हवा, पाणी व अन्न यांचे प्रदूषण त्यांची वास्तवता याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मानवी जीवनात संवाद आणि संवादाचे महत्त्व तसेच शिक्षण माणसाला जगण्यासाठी लायक कसे बनवते याबाबत त्यांनी उदाहरणासहित सविस्तर माहिती दिली.
‘अमृत महोत्सव आणि महिला विकासाचे सकारात्मकता’या विषयावर प्राजक्ती वाघ-भोसले यांनी मार्गदर्शन करताना गेल्या ७५ वर्षात भारताने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
प्राचीन काळातील स्त्री, मध्ययुगातील स्त्री, स्वातंत्रपूर्व काळातील स्त्री, स्वातंत्र्यानंतरची स्त्री आणि आजची स्त्री
व तिचे हक्क, अधिकार आणि तिच्या कर्तव्याची माहिती दिली. आधुनिक समाजातील स्त्रीचे स्थान याबाबत त्यांनी चिकित्सक मांडणी केली.
अशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये प्रमुख चार मार्गदर्शक तज्ञांनी आपापल्या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये भारताच्या विविध भागातून सहभागी झालेले प्राध्यापक, संशोधक यांनी आपल्या शोध निबंधावर आधारित तयार केलेल्या व्हिडीओ क्लिपचे सादरीकरण करण्यात आले.
या आंतरविद्याशाखीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेला ९५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामध्ये ४० संशोधकांनी वेगवेगळ्या विषयावर आपले शोधनिबंध सादर केले.
प्रमुख मार्गदर्शक कुलगुरू मा.डी.टी.शिर्के यांची ओळख डॉ.डी.एम.सिरसट, डॉ.किशोर गायकवाड यांची ओळख प्रा.व्ही.व्ही. शिंदे, मा.भुजंगराव बोबडे यांची ओळख प्रा. एस. एन.पाटील व डॉ.प्राजक्ती वाघ-भोसले यांची ओळख डॉ.डी.एस.कोरगावकर यांनी करून दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा.एस.एन.पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता करण्यात आली. सदर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग, IQAC विभाग व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.