गिरिदुर्गांच्या तटबंद्यांना
जरा एकदा बिलगून बघ,
बुलंद बुरुजांच्या चिलखती चिऱ्यांना
फक्त एकदा स्पर्शून बघ…
आणि सांग मला,
*शहरी इमल्यांची आठवण येते का..?*
किल्ल्यांवरच्या पठारांवर
एकदा रात्री पहुडून बघ,
पौर्णिमेचं पिठूर चांदणं
स्वतःच्या अंगावर पांघरून बघ…
आणि सांग मला,
*पंचतारांकीत हॉटेलची आठवण येते का..?*
बाजी-तान्याचे पोवाडे
रायगडावरून गाऊन बघ,
देवराईतली राऊळघंटा
एकदा सांजवेळी वाजवून बघ…
आणि सांग मला,
*डी.जे.च्या धिंगाण्याची आठवण येते का..?*
खळाळणाऱ्या झऱ्यात
फक्त जरा बसून बघ,
कोसळता धबधबा
तुझ्या पाठीवर जरा झेलून बघ…
आणि सांग मला,
*रिसॉर्टमधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण येते का..?*
कड्यावरच्या ठाकरांकडल्या
चहाचे भुरके मारुन बघ,
धनगराच्या झापात बसून
धारोष्ण दूध पिऊन बघ…
आणि सांग मला,
*पेप्सी, कोक, सेव्हन अपची आठवण येते का..?*
चुलीवर भाजलेली कांदाभाकरी
एकदा जरा चाखून बघ,
सारवलेल्या जमिनीवर बसून
केळीच्या पानात जेवून बघ…
आणि सांग मला,
*मॅकडोनाल्डच्या बर्गरची आठवण येते का..?*
रानांमधून धावणाऱ्या
वाटांवरून जरा बागडून बघ,
मऊ ओल्या हिरवळीवरून
उघड्या पायांनी चालून बघ…
आणि सांग मला,
*इटालियन मार्बलच्या फरश्यांची आठवण येते का..?*
प्रतिष्ठेच्या क्षणभंगूर कवचातून
जरा बाहेर येऊन बघ,
निसर्गाच्या संगीतावर
आयुष्याची बासरी वाजवून बघ…
आणि सांग मला,
*स्वतःची तरी आठवण येते का..???*