पक्ष निरीक्षकांकडून भूमिका स्पष्ट; आगामी निवडणुका स्वबळावर लढणार…
कुडाळ
येथील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची मागणी महाविकास आघाडीकडे करण्यात आली आहे. सत्तेच्या चाव्या आमच्याकडे असल्याने या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तर येत्या दोन दिवसात वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी भूमिका काँग्रेस पक्ष निरीक्षक विनायक देशमुख यांनी आज येथे मांडली. दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, काँग्रेसच्या सदस्य मोहिमेचा शुभारंभ व जास्तीत जास्त सदस्य काँग्रेस पक्षाचे होतील या दृष्टीने आजच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. असून यापुढे महा विकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना महिन्यातून एकदा सिंधुदुर्गाच्या दौऱ्यात आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी या पुढेही सर्व प्रकारचे प्रयत्न राहतील सिंधुदुर्गात गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. काही ठिकाणी पक्षाला यश आले तर काही ठिकाणी अपयश आले. पण ज्याच्या अपयशाचा गणित न घालता पक्षाचे काम अधिक जोमाने होईल. यासाठी जिल्हा काँग्रेस काम करेल प्रांताध्यक्ष नाना पटोले, संपर्कमंत्री बंटी पाटील त्यांच्या माध्यमातून काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी व काँग्रेस विचारधारा मानणाऱ्या लोकांना या पक्षाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील महा विकास आघाडी व त्यांचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस यांना जिल्ह्यात त्यांच्या घटक पक्षाकडून फारसे महत्त्व दिले जात नाही. याबाबत आपण पालक मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणार आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या बाबतीत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आमच्याशी संपर्क साधून चर्चा करूया असे सांगितले होते. मी पण त्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करू, असे सांगितले असुन येत्या दोन चार दिवसात यावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आम्ही शिवसेना राष्ट्रवादी या घटक पक्षांना अधिक महत्त्व देण्याचे ठरवले आहे. मात्र नगराध्यक्ष काँग्रेसचा राहील या चर्चेवर आम्ही ठाम राहणार आहोत. आणि तसा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतला आहे. त्याची कल्पना प्रदेशाध्यक्षांच्या सर्वांना दिलेली आहे. शेवटी सत्तेच्या चाव्या या कॉंग्रेसकडेच आहेत, याचे भान आघाडीतील घटक पक्षाने ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.