खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी देण्यात येणार प्रवेश
तळेरे: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्यायत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास इ. सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ऍथलेटिक्स, आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, बॅडमिंटन,शूटिंग, कुस्ती, हॉकी टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स इ. खेळांच्या खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी याबाबत अर्हता खालीलप्रमाणे आहे.
*सरळ प्रवेश प्रक्रिया :-* क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा • खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्यासंबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्षा आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
*अनिवासी प्रवेश प्रक्रिया :* अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त करणा-या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडू संख्या एका प्रबोधितीत २५ अशी राहील.
प्रवेशाकरिता विभागस्तर व राज्यस्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा सहभाग नोंदविण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज दि ७ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उपलब्ध होणार असून इच्छूक खेळाडूंनी उपरोक्त नमूद कालावधीत अर्ज सादर करावेत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.