You are currently viewing क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य प्रवेशाकरिता विभागस्तर व राज्यस्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

            प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास इ. सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ॲथलेटीक्स, आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक इ. खेळांच्या खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

            क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी याबाबत अर्हता पुढीलप्रमाणे आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.

            खेळनिहाय कौशल्य चाचणी – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.

            अनिवासी प्रवेश प्रक्रिया – अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी खेळाडू संख्या एका प्रबोधिनीत 25 अशी राहील.

            सहभागासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहेत. तरी इच्छुक खेळाडूंनी अर्ज सादर करावेत असे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा