You are currently viewing काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटणे हेच शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार, खासदारांचे काम

काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटणे हेच शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार, खासदारांचे काम

काँग्रेसचे विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांचा आरोप

मालवण

काँग्रेस पक्ष राज्यातील आघाडी सरकार मध्ये सहभागी असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारी पक्षाकडून मिळणारी वागणूक ही निराशाजनक आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार पालकमंत्री, आमदार, खासदारांकडून होत असून ही सर्व परिस्थिती आम्ही पक्ष नेतृत्वाकडे वृत्तपत्रांच्या कात्रणासह मांडली आहे. त्यामुळे कुडाळमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर घेतला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभा उमेदवार तथा युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. आमच्या पाठींब्याशिवाय सत्ता स्थापन करणे कोणालाही शक्य नाही. जिल्ह्यात आमच्या पक्षाचे आमदार, खासदार नसतानाही आम्ही स्वबळावर लढलो. जनतेनेही विश्वास दाखवत आम्हाला पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे आमची कामगिरी नक्कीच दमदार आहे. जिल्ह्यात परिस्थिती अनुकूल नसतानाही कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. असेही मोंडकर म्हणाले.

मोंडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेसने दोन जागा जिंकल्या व आमच्या शिवाय कुणालाही बहुमत सिद्ध करता येणार नाही, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी खासदार सुधीर सावंत व मंत्री नारायण राणे हे दोन मोठे नेते पक्ष सोडून गेल्यानंतर स्थानिक पातळीवर थोडं फार संघटन असताना नगरपंचायत वर दोन सदस्य व जिल्हा बँकेचे तीन संचालक कार्यकर्त्यांनी निवडून आणले आहेत. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेहनतीने खेचून आणलेला हा विजय आहे. राज्यातील सरकार हे आघाडीत असलं तरी जिल्ह्यात मात्र सहकारी पक्षा कडून मिळणारी वागणूक ही निराशाजनक आहे. असा आरोप मोंडकर यांनी केला.

गेली काही वर्षे युती सरकारच्या काळात रस्त्यांची दुर्दशा झाली होती. मात्र गेल्यावर्षी आम्ही मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन नागरिकांच्या, स्थानिक ग्रामपंचायतींच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांना विनंती करून पत्रव्यवहार केला. त्यावर ना. चव्हाण साहेबांनी जिल्ह्यातील रस्त्यांना कोट्यवधींचा निधी दिला. हा निधी कुठे ही कमी न पडता आज जिल्ह्यातील रस्ते मग तो कसाल – मालवण, कुडाळ- मालवण असो वा तारकर्ली- देवबाग असो वा घाटमाथ्यावर जाणारा रस्ता यांचा समावेश आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गेली दोन दशके रेंगाळत असलेल्या जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी खास तरतूद करून दिली, ते ही लवकरच पूर्णत्वास येत आहे. मंत्री अस्लम शेख यांनी देखील जिल्ह्यातील बंदरात भविष्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकिकरण व्हावं तसेच पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा याकरिता भरीव निधी देऊन आज बंदरांचा विकास केला, मच्छीमार महिला, बांधवांना त्यांच्या खात्यावर अनुदान दिले. काही प्रमाणात अजून अनुदान देखील येत आहे.

गतवर्षी आलेल्या वादळात देखिल पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली. खनिकर्म व्यवस्थापन निधीतुन रुग्णवाहिका देखील दिल्या. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कुडाळ येथील बाल रुग्णालय व ओरोस येथील केंद्राला कोट्यवधीचा निधी देऊन त्याच देखील काम प्रगतीपथावर आहे. मात्र जिल्ह्यातील सहकारी पक्षाच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी आमच्या मंत्र्यांचा नामोल्लेख टाळत स्वप्रयत्नाचा बडेजाव केला.

या सर्व बाबींची कल्पना, पेपर मधील बातम्या कात्रण आम्ही वरिष्ठ नेत्यांना देऊन यावर चर्चा करून सद्यस्थितीतील कल्पना दिली असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावर मार्ग काढत वरिष्ठ निर्णय घेतील. दोन दिवसात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

WhatsAppFacebookTwitterGmailShare

प्रतिक्रिया व्यक्त करा