आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारकीर्द.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या काही महिन्यात एकेरी आकड्यांवर मर्यादित असलेले कोरोनाचे रुग्ण गणेशोत्सव पासून दोन हजारी टप्पा पार करून गेले. संपूर्ण जिल्ह्याचा आलेख पाहिला असता कणकवली तालुक्यात आणि मुख्यत्वे कणकवलीत कोरोनाचे रुग्ण सर्वात जास्त आढळून येत होते.अनेकांचे मृत्यूही झाले होते. कोरोनामुळे कणकवली शहराची होत असलेली बदनामी रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेत कणकवली बाजारपेठ आठ दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले तसेच कणकवलीकर जनतेला जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन केले.
कणकवली म्हणजे जिल्ह्यातील स्फोटक शहर, राजकारण त्यांच्या अंगाअंगात भिनलेले. त्यामुळे विरोध हा होणारच याची खात्री होती, परंतु कणकवली मधील काही व्यापारी कोरोनाचे बळी बनले आणि लोकांच्या मनातही भीतीची पाल चुकचुकली त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या एकत्र येण्यामुळे कणकवलीत जनता कर्फ्यू सतत आठ दिवस यशस्वी केला आहे.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोख कामगिरी करत कणकवलीकरांना एकत्र आणण्यात यश मिळविले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवलीतील जनतेने एकत्र येत जनता कर्फ्यू यशस्वी करत कोरोना लढाईत आपण सर्व एक आहोत, याचं एक उत्तम उदाहरण जिल्हावासीयांसमोर उभे केले आहे. मेडिकल वगळता शहरातील सर्वच दुकानदार, छोटे व्यावसायिक यांनी आर्थिक नुकसान होत असतानाही आस्थापने, दुकाने बंद ठेवली होती.
कणकवलीत जनता कर्फ्यू यशस्वी केल्यानंतर समीर नलावडे यांनी प्रतिक्रिया देताना कणकवलीतील जनता, व्यापारी, विविध सेवाभावी संघटना, नगरसेवक, गटनेते, राजकीय पदाधिकारी, नेते व पत्रकार यांच्यामुळेच बंद यशस्वी झाल्याचे सांगितले. या बंद नंतरही कोरोना संपलेला नसून जेव्हा गरज असेल तेव्हाच मास्क लावून, सोशल डिस्टनसिंगचे पालन करून,बाहेर पडावे, हात स्वच्छ धुवणे, सॅनिटायझर वापरणे या सर्व गोष्टीं वेळच्या वेळी पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच या आठ दिवसांच्या बंदचा शहराला नक्कीच फायदा होणार अशी खात्री दिली.
आजपर्यंत नगराध्यक्ष म्हणून आपण केलेल्या आवाहनाला कणकवलीकरांनी उत्तम प्रतिसाद देत साथ दिली आहे. कणकवलीतील राजकीय वाद, मतमतांतरे बाजूला ठेवल्याने बंद यशस्वी झाला आहे, यापुढेही आतापर्यंत खबरदारी घेतली तशी खबरदारी घेऊन कोरोनाला रोखायचे आहे त्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी कणकवलीकरांना केले आहे.
आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राणेंसारखेच धडाकेबाज काम कणकवली सारख्या शहरात करत नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी नगराध्यक्ष म्हणून त्यांची गणना होऊ लागली आहे.