आठ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल कणकवली वासियांचे आभार
समीर नलावडे – नगराध्यक्ष कणकवली नगरपंचायत
कणकवली
कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर पर्यत जनता कर्फ्यू चे आवाहन केल्यानंतर त्याला कणकवलीकर व कणकवली शहरातील विविध घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा जनता कर्फ्यू यशस्वी केला. covid-19 चा कणकवली शहरात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वांच्या साथीने जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या आठ दिवसात पाळलेल्या कर्फ्यु मुळे कोरोना ची साखळी तोडण्यासाठी आपण निश्चितच यशस्वी होऊ. आठ दिवस पाळले म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. आठ दिवसाच्या जनता कर्फ्यू नंतरही आपल्याला नियम पाळायचे आहेत. सोमवारपासून ज्यावेळी आपण अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडू त्यावेळी प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर ने हात स्वच्छ करणे, या व अन्य इतर वेळी पाळल्या जाणाऱ्या नियमांचेही आपल्याला यापुढेही पालन करायचे आहे. कणकवली वासियांनी या जनता कर्फ्यु ला दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे. कणकवलीकरांच्या एकी मुळेच हा कर्फ्यू खऱ्या अर्थाने जनता कर्फ्यु म्हणून यशस्वी झाला. कणकवलीतील नागरिक, व्यापारी, विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटना, कणकवली चे सर्व नगरसेवक व गटनेते, कणकवली शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी व राजकीय नेते, पत्रकार यांच्या सहकार्यामुळेच हा बंद यशस्वीपणे पूर्ण होऊ शकला. याबद्दल या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कणकवलीतील व्यापाऱ्यानी गेल्या सहा महिन्यात कोरोना व लॉक डाऊन मुळे आर्थिक नुकसान होत असतानाही या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होत मोलाचा वाटा उचलला. छोटे व्यवसायिकही यात सहभागी झाले. अत्यावश्यक म्हणून मेडिकल वगळता सर्वच दुकाने आठ दिवस कडकडीत बंद ठेवल्यामुळे येत्या काळात त्याचा मोठा फायदा कणकवली तालुक्याला निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. कणकवली शहरवासीय यांनी आतापर्यंत अनेकदा मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. यावेळी आम्ही सर्व कणकवलीवासी यांनी एकत्र येत जनता कर्फ्यु ची हाक दिली होती. ती यशस्वी झाली. कणकवली शहर व तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण व त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत असताना कुठेतरी हा निर्णय घेणे येणे गरजेचे होते. याबाबत विविध मतमतांतरे ही झाली मात्र अखेर सर्वांनी एकत्र येत राजकीय मतभेद किंवा वाद बाजूला ठेवून बंद साठी जो सहभाग दर्शवला त्यामुळेच हे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले. कणकवली शहरात यापुढेही आपल्याला कोरोना ची साखळी रोखायची आहे.आतापर्यंत जशी खबरदारी घेतली तसेच खबरदारी यापूढे पण घेऊया.