वेंगुर्ला :
वेंगुर्ल्याचे लोकप्रिय नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा नागरी सत्कार २२ जानेवारी रोजी येथील साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर पत्रकार शेखर सामंत, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, स्वच्छता दूत सुनिल नांदोस्कर, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.
चांगल्या लोकांनी राजकारणात राहिले तरच नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास होऊ शकेल. शहरातील विकास कामात राजकारण आणू नये हा दिलीप गिरप आणि त्यांच्या टीमने घालून दिलेला परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत आहे. शहराच्या वैभवात भर घालणा-या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची देखभाल आणि देखरेख होणे तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर यांनी केले.
नगराध्यक्ष गिरप यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात नगराध्यक्ष गिरप यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणारे माजी नगरसेवक प्रशांत आपटे, न.प.चे कलादालन साकारणारे, क्रॉफर्ड मार्केट, मच्छिमार्केटच्या भिती सजीव करणारे चित्रकार सुनिल नांदोस्कर यांचाही शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक सुहास गवंडळकर यांचा शाल, श्रीफळ देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. हे सत्कार समारंभ दिलीप गिरप यांचा मित्रपरिवार आणि हितचितक मंडळी यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमात मोहन होडावडेकर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, सतिश डुबळे, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, अॅड.शाम गोडकर, प्रा.वसंत पाटोळे, सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, सुरेश बोवलेकर यांनी दिलीप गिरप यांची यशस्वी कारकिर्द आणि साकारलेल्या विकासकामांबद्दल अभिनंदन करुन समाधान व्यक्त करताना यापुढेही त्यांनी राजकारणातून निवृत्त न होता सक्रीय रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारमूर्ती सुनिल नांदोस्कर म्हणाले की, आपण केलेल्या या अनपेक्षित सत्काराने मी भारावून गेलो आहे. आपले प्रेम असेच कायम रहावे. शहराच्या कलात्मक मांडणी माझे आणि विद्यार्थ्यांचे योगदान देता आले, याचे आपल्याला समाधान आहे. तर प्रशांत आपटे यांनी आमचे टीम लिडर नगराध्यक्ष गिरप यांच्यामुळेच विकास कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकली. नगरसेवक म्हणून कार्यरत असताना नेमक्या प्रशासकीय, राजकीय अडचणी लक्षात आल्या आणि पाच वर्षाच्या काळात नगरसेवक पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष गिरप यांनी माझ्या मित्रपरिवाराने आयोजित केलेला आजचा हा सत्कार समारंभ अनपेक्षित आहे.
कुठलाही पूर्वानुभव नसताना जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करण्याची संधी मला आणि आमच्या टीमला मिळाली. काम करताना जरी अडचणी आल्या तरी शक्यतो कुठेही वाद होणार नाहीत याची दक्षता घेतली. आपल्या हातात पाच वर्षेच आहेत हे लक्षात घेऊन नियोजन केलेले जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण होतील याची काळजी घेतली. त्यामुळे या कामांबद्दल नागरिक समाधानी असल्याची पोचपावती मिळते अशा भावना श्री. गिरप यांनी व्यक्त केल्या.
मानपत्राचे वाचन सीमा मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अॅड. शशांक मराठे यांनी केले.