💡 *प्रश्न: सामान्य लोकांना हव्या त्या सुखसोयी मिळाल्या तर त्यांना सुख प्राप्त होईल का?*
✅ *:- वास्तविक,”सुख सोय” हा शब्द मुळांत आपण चुकीचा वापरत असतो.सुख आणि सोय या दोन गोष्टी मुळातच भिन्न आहेत.परंतु सोयी उपलब्ध झाल्या की,सुख मिळाल्याचा आभास निर्माण होतो. म्हणूनच सुख सोय असा शब्द प्रयोग आपण वापरतो.वास्तविक सोय,स्वास्थ्य आणि सुख अशा तीन गोष्टी भिन्न असून त्या मिळविण्याची साधने सुद्धा भिन्न आहेत.“सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख साधन म्हणजे ‘पैसा’ हा होय.सोयी मिळाल्यानंतर माणसाची शरीराच्या दृष्टीने संसारात उत्तम व्यवस्था होते. म्हणूनच लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की,नाना प्रकारच्या सोयी प्राप्त झाल्या की आपण सुखी होऊ.या कल्पनेच्या आधीन झाल्यामुळे व पैशाच्या बळावर सर्व सोयी प्राप्त होतात म्हणून लोक पैशाच्या मागे धावत सुटलेले आहेत.परंतु प्रत्यक्षात मात्र असे आढळून येते की श्रीमंत पैसेवाले लोकच काळजी,चिंता,मनस्ताप ह्यांनी जास्त घेरलेले असतात. पैशाने माणूस सुखी झाला असता तर जगातले सर्व श्रीमंत लोक सुखी आहेत असे दिसले असते.परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र याच्या उलट आहे.आत्महत्त्या करणाऱ्या लोकांत श्रीमंतांचे प्रमाण अधिक असते. मात्र याचा अर्थ असा नव्हे की गरीब लोक सुखी असतात.श्रीमंतांना निदान जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी व इतर सोयी उपलब्ध असतात.त्यामुळे ते जरी खऱ्या अर्थाने सुखी नसले तरी त्यांचे जीवन सुसह्य असते.परंतु गरीबांची गोष्ट मात्र अगदी वेगळीच आहे.त्यांना सुख तर मिळत नाहीच,पण जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी व इतर सोयी न मिळाल्यामुळे,त्यांची अवस्था अतिशय केविलवाणी व काही प्रसंगी अगदी भयानक होते.*
🎯 *थोडक्यात,पैशाच्या बळावर सोयी उपलब्ध होतात परंतु स्वास्थ्य आणि सुख पैशाच्या बळावर मिळू शकत नाही.*
*🙏सद्गुरु श्री वामनराव पै.🙏*