भावपूर्ण श्रदधाजंली
कणकवली
माणंसाचा जन्म होतो ‘मातेच्या’ कुशीत आणि अंत होतो ‘मातीच्या’ कुशीत, ‘माता’ आणि ‘माती’ यामध्ये असणारी वेलांटी म्हणजे ‘जीवन’. जन्म – मृत्यू हि कल्पनातीत चालणारी अशी निसर्ग क्रिया आहे. परंतु एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच, आयुष्याच्या वेगवेगळया वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. असेच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेले, ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ यांचा ध्यास आणि कास असलेले, कणकवली तालुक्यातील शिवडाव गावचे सुपुत्र ‘शीव’स्वरुप,ऋषीतुल्य एक असामान्य व्यक्तीमत्व गुरुवर्य कै.सिताराम सखाराम उर्फ बाबा नाडकर्णी यांचे बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी वृदधापकाळाने दु:खद निधन झाल.
बाबा नाडकर्णी यांचा जन्म स्वांतत्र्यपूर्व काळात २० ऑगस्ट १९२७ रोजी मुंबई -गिरगाव, खोताची वाडी येथे झाला. बाबांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात गांव मौजे कुडाळ मधून झाली. १९४४ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून ‘मॅट्रीक’ उत्तीर्ण झाले. त्यानंतर इंटर सायन्स करुन मुंबई येथील प्रसिदध हाफकीन इन्स्टिटयुटमध्ये सुरुवातीला काही काळ नोकरी पत्करली. परंतू मूळ गाव शिवडाव वर असलेल्या प्रेमापोटी शहरातील मोठया पगाराची नोकरी सोडून बाबा गावी परत आले. मौजे कनेडी येथे माध्यमिक शिक्षणाची सोय करण्यासाठी तेथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुरु केलेल्या ‘कनेडी हायस्कूलमध्ये’ बाबांची सन्मानाने शिक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आणि इथेच बाबांमध्ये दडलेल्या शिक्षकाने ख-या अर्थाने शिक्षणक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले.
त्यानंतर १९६४ मध्ये पुणे विदयापीठातून पदवी घेऊन शिवाजी विदयापीठाची बी.एड. पदवी संपादित केली. बाबांनी ज्या संस्थेत शिक्षणाचे महान कार्य सुरु केले त्या संस्थेशी आणि हायस्कूलशी एवढे एकरुप होऊन गेले की हायस्कूल हे नोकरी ठिकाण म्हणून न मानता आपल घर म्हणून त्या ज्ञानमंदिरात वावरले. त्यामुळेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग, विदयार्थी, पालक, त्यांची ओळख नाडकर्णी सर म्हणून न राहता नेहमीच ‘बाबा नाडकर्णी’ म्हणूनच राहिली.
शिवडाव गावाकरीता बाबांनी नेहमीच ‘आव्हाने’ स्विकारुन अशक्य ते शक्य करुन दाखवण्याची किमया केली.त्यांच्या अंगीअसलेल्या स्पष्टवक्तेपणा, उच्च आचार- विचार, निर्णय क्षमता, जिदद आणि चिकाटी या गुणांमूळेच बाबांनी सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, अध्यात्मिक, क्रीडा, कृषी-विकास या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये लिलया संचार केला व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या अशा गुणसंपन्नते मुळेच शिवडाव गावांतील ग्रामस्थांनी १९५४ मध्ये ग्रामपंचायत ‘शिवडावचे प्रथम सरपंच’ होण्याचा बहुमान बाबांना प्राप्त करुन दिला. गावचे प्रथम नागरिक या नात्यानेही त्यांनी गावाला विकासाच्या दिशेने सोबत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांनतर शिवडाव ग्रामस्थांनी शिवडाव गावातील मुलांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सुरु केलेल्या ‘शिवडाव हायस्कूल, शिवडाव’ च्या शालेय समितीचे चेअरमन पद मोठया जबाबदारीने स्वीकारले आणि शिक्षणाचा पाया रचला. शिवडांवमधील परमार्थ साधनालयाचे कार्यकारी विश्वस्त म्हणूनही बाबांनी काम पाहिले. बाबा जिथे जिथे वावरले त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या “परिस स्पर्शाची” प्रचिती इतरांना अनुभवता आली हे आम्हा सर्व शिवडाव वासीयांचे परमभाग्य आम्ही समजतो. कनेडी हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्या संस्थेत त्यांनी शालेय समितीवर काम केले बाबांचे हे सर्वच क्षेत्रातील कार्य शिवडाव पंचक्रोशीतील लोकांच्या स्मरणामध्ये कायमचे राहिल. बाबांच्या अध्यापन कौशल्याबददल त्यांचे अनेक विदयार्थी आजही भरभरुन बोलतात. आज बाबांचे बरेच विदयार्थी डॉक्टर, वकील, अभियंता, सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी अशा मानाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. एक हाडाचे शिक्षक, कठोर परीश्रम करणारे सुजान जेष्ठ नागरीक, सामाजिक कार्यकर्ते आणि आम्हा सर्वांचे “बाबा” म्हणून तुमच्या सर्व आठवणी आमच्या अंतकरणात सदैव चिरंतन राहतील.
आज ‘बाबांचा बारावा दिवस ……. ‘ खर तर बाबांच्या कार्याविषयी काय लिहायच! एका पानांमध्ये तर हे मावणारच नाही परंतू तरीही त्यांच्या समाजकार्याचा थोडक्यात लेखाजोखा घेण्याचा हा प्रयत्न.
अशा हया ऋषितुल्य व आदर्श व्यक्तित्वास समस्त शिवडाव ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रदधाजंली!!!
श्री. प्रदीप मा. सावंत.
शिवडाव- कणकवली
९१३०६१११५१/ ९४२३८१८७५२