You are currently viewing जागतिक कन्या दिवस..

जागतिक कन्या दिवस..

विशेष संपादकीय…..

जागतिक कन्या दिवस

“एक गोड परी असावी,
प्रत्येकाच्या घरात.
सुख समाधान हास्य उल्हास,
घेऊन येते ती दारात.”

खरंच एक कन्या असावी प्रत्येकाच्या घरात. मुलीच्या असण्याने घराचे सौन्दर्य वाढते, तिच्या खेळण्या बागडण्याने, पैंजणीच्या आवाजाने घरात आनंदाची लहर उठते.
एक काळ होता, मुलगी म्हटली की बोझ वाटायचा, मुलगा म्हणजेच घराचा वारस अशीही समज होती. समाज कितीही पुढारला तरी ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी मुलगाच हवा हा अट्टाहास असतो. स्त्रीभ्रूण हत्या ह्या अजूनही चोरीछुपे केल्या जातात. सरकारने आणलेल्या बंदीमुळे आज कितीतरी पटींनी त्यात घट झाली आहे, परंतु माणसांची मानसिकता बदलणे अजूनही अत्यंत गरजेचे आहे.
एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या करणारे काही विकृत मनोवृत्तीचे नमुने असताना सुधारित सुसंस्कृत, सुशिक्षित समाज मात्र मुलींच्या आगमनाने उल्हासित होत एकंच मुलगी पुरे म्हणून सुखासमाधानाने, आनंदाने मुलीचे संगोपन करून त्यांना उच्चशिक्षित बनवून समाजात मानाने जगण्याची प्रेरणा देताना दिसतो. मुलांच्या येण्याने आनंदी होणारा समाज आज बदलताना, मुलींच्या जन्माचे स्वागत करताना पहायला मिळतो. त्याचंही कारण म्हणजे समाजात मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुली आणि मुलांपेक्षाही प्रत्येक ठिकाणी किंचित पुढेच असणाऱ्या मुली.
देशात अशा कितीतरी कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांनी स्वकर्तृत्वाने एक विशिष्ठ उंची गाठली आहे. मुलींना समाजात मान उंच करून जगण्यास प्रेरणा दिली आहे. अगदी चंद्रावरही जाण्यास मुली कधी मागे पडल्या नाहीत. मुलींच्या शिक्षणासाठी जेव्हापासून लढा सुरू झाला तेव्हाही म्हातारी कोतारी माणसे म्हणायची, “मोळी विक, पण शाळा शिक”. शिक्षणाने समाज सुशिक्षित, सुसंस्कृत होतो याचे महत्व त्यांनाही पटू लागले होते, म्हणूनच आज समाजात मुली शिकल्या, मोठ्या झाल्या, मानाने समाजात वावरू लागल्या. देशाच्या राष्ट्रपती पदापासून पंतप्रधान, मुख्यमंत्री पदी सुद्धा महिला अगदी अभिमानाने बसलेल्या पहायला मिळाल्या.
वैमानिक, रेल्वेची ड्राइवर, सैन्यातील उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, इथपासून ते गृहिणी पर्यंत महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चूल आणि मूल यात अडकून न राहता आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण हेच त्यांच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. राष्ट्राच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाचा ध्यास हवा तरच पुढे राष्ट्राच्या प्रगतीत मुली सुद्धा मोलाचा हातभार लावताना दिसतील.
शिक्षणाने समाजात मान उंचावून चालणाऱ्या सावित्रीच्या लेकी आता नाही नमणार….डोईवरचा पदर आता त्या कमरेला खोचणार….
प्रगतीकडे चालणाऱ्या समाजाला आता सांगावे लागतेय….
मुलगी झाली म्हणून जनहो नको डोळ्यात आणू पाणी….शिक्षण देऊन बनवा तिला झाशीची राणी….

संवाद मिडिया कडून जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा..💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा