You are currently viewing प. पू. भालचंद्र बाबांच्या ११८ व्या जन्मोत्सवास आजपासून प्रारंभ..

प. पू. भालचंद्र बाबांच्या ११८ व्या जन्मोत्सवास आजपासून प्रारंभ..

पुढील ४ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

कणकवली

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११८ वा जन्मोत्सव सोहळ्यास आज पासून धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सवात होणारे विविध धार्मिक विधी भाविकांना गर्दी न करता घरबसल्या पाहता यावे म्हणून संस्थांच्यावतीने युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी देखील मंदिर परिसरात गर्दी करता यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून या सोहळ्याच्या प्रारंभाचा लाभ घेतला. बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त समाधीस्थळी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून संस्थान परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

गुरुवारी पहाटे भालचंद्र महाराजांच्या समाधी पूजनाने या उत्सवाची सुरुवात झाली. सकाळी ब्रम्हवृदांच्या मंत्रोपचारात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र दत्तयाग करण्यात आला. तसेच सत्यनारायणाची पूजा पार पडली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, संस्थांचे पदाधिकारी दादा नार्वेकर,अशोक सापळे,विश्वस्त मुरलीधर नाईक,प्रसाद अंधारी,अँड.प्रवीण पारकर,व्यवस्थापक विजय केळुसकर,गजानन उपरकर, बाळा सापळे,भरत उबाळे आदी उपस्थित होते. तद्नंतर दुपारच्या सत्रात भजनी बुवांनी सुश्राव्य भजने सादर केली. रात्री दैनंदिन आरती होणार आहे.

तर २१ ते २३ जानेवारी या कालावधीत पहाटे समाधी पूजन , सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र दत्तयाग १ वा भजने , रात्री ८ वा . दैनंदिन कार्यक्रम होणार आहे . सोमवार २४ जानेवारी हा परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११८ जन्मदिन असून त्यानिमित्त सकाळी समाधीपूजन , सकाळी ९ .३० ते ११.३० यावेळेत समाधीस्थळी लघुरुद्र , दुपारी ११.३० ते १२.३० यावेळेत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत बाबांचा जन्मोत्सव व त्यानंतर भजने होणार आहेत . तर सायंकाळी ६ वा.मंदिर परिसरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक निघणार आहे . त्यानंतर रात्री दैनंदिन आरती होणार आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव सोहळा शासनाचे नियम व अटींचे पालन करून साधेपणाने साजरा केला जाणार आहे . त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी आणि जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा , असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा