You are currently viewing पाप – पुण्य समज, गैरसमज

पाप – पुण्य समज, गैरसमज

 

निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.

*प्रश्न १८ :- धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?*

*उत्तर :-* ‘ धर्म ‘ या संकल्पनेचा एका बाजूने परमेश्वराशी संबंध येतो तर दुसऱ्या बाजूने संस्कृतीशी संबंध येतो .

धर्मामध्ये जे तत्वज्ञान सांगण्यात येते त्या तत्वज्ञानाचे मूळ धर्माने स्वीकारलेल्या परमेश्वराच्या संकल्पनेत असते .

त्याचप्रमाणे धर्माने स्वीकारलेली परमेश्वर ही संकल्पना व धर्माने स्वीकारलेले तत्वज्ञान यांच्या अधिष्ठानावर संस्कृतीचा जन्म होतो .

संस्कृती या संकल्पनेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो . विविधता प्रकारच्या रुढी, प्रथा, परंपरा, उपासना पध्दती, विविध प्रकारची कर्मकांडे वगैरे या सर्वांचा ‘ संस्कृती ‘ या संकल्पनेत समावेश होतो .

ज्या प्रकारची संस्कृती असते त्या प्रकारचे इष्ट किंवा अनिष्ट शिक्षण , शिकवण व संस्कार त्या धर्मातील लोकांवर केले जातात . हे संस्कार धर्मातील धर्ममार्तंड यांच्या धर्मातील लोकांवर बालपणापासून करीत असतात .

परिणामी देवाधर्माच्या नांवाखाली केलेले हे संस्कार त्या धर्मातील लोकांच्या अंतर्मनात जाऊन तेथे ते मूळ धरतात व नंतर ते दृढ होऊन बहिर्मनात प्रवेश करुन जीवनात साकार होतात .

देवाधर्माच्या नांवाखाली संस्कृतीच्या द्वारे धर्मातील लोकांवर जे संस्कार केले जातात त्या संस्कारांना अनुसरुन प्रथम विचार निर्माण होतात व त्याच विचारांचे परिवर्तन उच्चार व आचारात होते .

इष्ट किंवा अनिष्ट विचारांना अनुसरुन इष्ट किंवा अनिष्ट उच्चार व आचार निर्माण होतात आणि तेच माणसाला सुखी किंवा दुःखी जीवन प्राप्त करुन देण्यास कारणीभूत ठरतात . *(..क्रमशः ..)*

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

प्रतिक्रिया व्यक्त करा