जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचा मित्र नितीनच्या पाचव्या स्मृतिदिन आठवणींना उजाळा देणारा लेख
*भावनांना गाडून टाकल्या तरी*
*उफाळून येतात त्वेषाने…*
*कितीवेळा समजवायचे मनाला*
*मन पेटून उठते…द्वेषाने*
तुझी संगत सुटली… अन मन पेटून उठले द्वेषाने…भांडलेही नियतीबरोबर….का केली अनहोनी…???
संगत होती काहीच वर्षांची….जुळलेली जणू जनजन्मांतरीचे नाते टिकवायला…पण मंजूर नव्हते तेही नियतीला…अर्ध्याघडीचा डाव तो….तिनेच मांडला होता साथीला…नकळत डाव साधला गेला…नव्हतं कुणी सोबतीला..निघून गेला प्राण हळूच…न समजले विझताना…त्या दिव्याच्या वातीला….
असाच तू नकळत निघून गेलास…का?….कसा?….नाही कळले मला…
कॉलेजचे ते दिवस अन तुझं खळाळणारं हास्य…गालातल्या गालात हसलास तरी….चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद…मैत्रीतला राजा माणूस….की राजा माणसाची मैत्री…दोन्ही अनमोलच. अवकाशात भरारी मारणाऱ्या घारीची नजर मात्र जमिनीवर खिळलेली असते…घार भक्ष्य शोधत असते… तू उंचीने छोटा होतास…आमच्यासाठी दीड फूट..पण नावाने कितीतरी मोठा होतास.. आणि मनाने तर खूपच मोठा…. घारीसारखी तुझी नजर सुद्धा उंचीवर गेल्यावरही जमिनीवरच होती…गोरगरिबांबद्दल मनात कणव….ना कसली घमेंड ना मोठेपणा… सरळ साधी राहणी…अगदी पारिजातकासारखीच…..
पारिजात…प्राजक्त….पानांना चमक नसते…पण गुणधर्म औषधी….दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची ताकद असते पानांच्या काढ्यात… तीच ताकद…हिम्मत तुझ्या अंगात होती…मदतीसाठी तू सदैव उभा…प्राजक्तासारखाच धवल वर्ण….विखुरलेल्या पाकळ्यांसारखे जिकडेतिकडे खुळलेलं तुझं हास्य..तुझ्या अंगणात तू फुललास..मोहरलास…तुझ्या घराला सुगंधाने भारून टाकलस….दारात नंदनवन फुलवलस… अन तुझ्या वावरण्याचा…स्वभावाचा..मैत्रीचा…प्रेमाचा सुगंध मित्र-मैत्रिणीं, आजूबाजूचे…सगेसोयरे… सर्वत्र पसरवून सर्वांना तुझ्याकडे आकर्षून घेतलंस…खरंच अगदी त्या प्राजक्तासारखंच…..प्राजक्त रुजतो… फुलतो एकाच्या अंगणात…अन आपल्या नाजूक…सुंदर मोहक फुलांचा सडा सांडतो तो शेजाऱ्याच्या अंगणात…तुझ्यासारखाच…
*निरागस मैत्री नसते कधी प्रेमाहूनही कमी.*
*जर जीवनात असतील जिवलग मैत्र प्रेमाचे…*
*तर ती मैत्री नसते स्वर्गाहूनही कमी.*
अशीच होती स्वर्गातूनही सुंदर निरागस तुझी मैत्री….तुझ्या असण्याचे महत्त्व तू कायमच दाखवून दिलंस…घराला…मित्रमंडळींना..अन…सर्वानाच….मैत्रीची माळ गुंफण्याची तुझी कला तर कल्पनेच्याही पलीकडची….एक एक मणी वेचून… लकाकी देऊन…तुझ्या गोड स्वभावाचं अमृत लावून मायेच्या, प्रेमाच्या मैत्रीच्या धाग्यात असा काय गुंफायचास की ना कधी धागा तुटायचा…ना मणी विखुरले जायचे…तुझ्या मैत्रीच्या बंधनात ते मणी सुद्धा मोती होऊन चमकायचे…किंमती बनून जायचे.
फुलपाखराला चिमटीत पकडले….अन अलगद सोडून दिले तरी ते आपल्या नाजूकशा पंखातील रंग बोटांवर सोडून जातात….तुमची बोटे रंगीत करून…सजवून…निघून जातात दूरवर…पुन्हा कधीही चिमटीत न येण्यासाठीच…. तसाच तू तुझ्या अंतरंगातील रंग मैत्रीच्या माळेवर सोडून दूर निघून गेलंस तो कायमचाच…..
*सोबत जरी नसलास तरी*
*आठवणींची साथ आहे*
*हात निसटून गेला जरी*
*मैत्रीत तुझा भास आहे*
साथ सोडली जरी शरीराने आठवणी बनून तू सोबत राहिलास…हात सुटला जरी जीवनात तरी क्षणाक्षणास भास होऊन जगलास…तू जोडलेलं नातं जपत असतो प्रत्येक क्षणी…नातं जोडण्याची…जपण्याची तुझी सवय सर्वानाच लागली तर??
म्हणतात ना,
*”कुछ आदतें अच्छी होती हैं…”*
पण सर्वानाच तशा सवयी नसतात…लोहचुंबकासारखा खेचून घ्यायचास तू….नात्यात घट्ट पकडून ठेवायचास…
*”फेव्हीकॉल का मजबूत जोड”* असल्यासारख्याच…म्हणून तर तुझं माझं नातं तेव्हाही मजबूत होतं….अन तू गेल्यावर आजही…. तुझ्या आठवणींसोबत….अर्ध्याघडीचा डाव मांडून तू निघून गेलास…..आठवणींना मागे सोडून….छळण्यासाठी काही मनांना…
*नाही कळले मला का होते*
*सुंदर तुझ्या सहवासातील क्षण..*
*राहून राहून अजूनही तळमळतं*
*तुझ्या आठवांनी मित्रांचे मन*
*©[दिपी]✒️*
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६