अबुधाबी :
युवा क्रिकेटपटू शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पहिला विजय मिळवला. कोलकाताने सनराईजर्स हैदराबादवर ७ गडी राखून मात केली. गिलने नाबाद ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मॉर्गनने नाबाद ४२ धावा काढत गिलला चांगली साथ दिली.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील नरेन शून्यावर परतला. त्यानंतर नितीश राणा, कर्णधार दिनेश कार्तिक अपयशी ठरला. मात्र, त्यानंतर आलेल्या मॉर्गनने शुबमन गिलला सुंदर साथ दोघांनीही फटकेबाजी केली आणि ७ गडी राखून विजय मिळविला. हैदराबादकडून खलिल अहमद, नटराजन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्याआधी, डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे यासारखे दिग्गज फलंदाज संघात असताना सनराईजर्स हैदराबादला १४२ धावांवर रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आले. सनरायजर्सकडून मनिष पांडेने एकाकी झुंझ देत अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली.
१४३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची फार चांगली सुरुवात झाली नाही. मागील सामन्यात ९ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या सलामीवीर नरेनला यावेळी खातंही उघडता आलं नाही. दुसर्या षटकातील दुसर्या चेंडूवर वेगवान गोलंदाज खलील अहमदने त्याला बाद केले. मिड-ऑफवर डेव्हिड वॉर्नरला झेल देऊन तो पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर आलेल्या नितीश राणाने १३ चेंडूंत २६ धावांची झटपट खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.