निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.
*प्रश्न १६ :- मानवी जीवनात पाप-पुण्याच्या संदर्भात प्रारब्ध व क्रियमाण कशा पध्दतीने कार्य करीत असतात ? कृपया खुलासा करावा .*
*उत्तर :-* *(…क्रमशः ..)*
पूर्व आयुष्यात माणसांनी जी बरी – वाईट अनेक कर्मे केलेली असतात ती सर्व कर्मे पाप-पुण्य रुपाने माणसाच्या संचितात वास करुन राहतात व हे सर्व संचित माणसाच्या अंतर्मनात ठाण मांडून बसलेले असते .
चिंतन करीत राहणे हा माणसाचा स्वभाव आहे . हे चिंतन म्हणजे प्रत्यक्षात बँकेच्या भाषेत चेक आहे . बँकेत काउंटरवर जाऊन पैसे काढण्यासाठी स्लिप किंवा चेक सादर करावा लागतो व त्या चेकप्रमाणे आपल्याला इच्छित पैशाची रक्कम मिळते .
अगदी त्याचप्रमाणे माणूस जेव्हा खोल चिंतन करतो किंवा तीव्र चिंता करतो तेव्हा तो संचिताच्या काऊन्टरवर चिंतनाचा चेक सादर करतो व या चेकप्रमाणे माणसाला इष्टानिष्ट प्रारब्ध प्राप्त होत असते .
थोडक्यात , *इष्टानिष्ट स्वरुपाचे चिंतन सातत्याने केल्याने संचितातील पाप-पुण्य जागृत होऊन इष्टानिष्ट प्रारब्ध रुपाने माणसाच्या जीवनात प्रवेश करतात .*
*सामान्यपणे त्या इष्टानिष्ट प्रारब्धाचे भोग भोगित असताना माणसाच्या हातून विचार , उच्चार व आचाररुपाने जी कर्मे घडत असतात त्या कर्मांना क्रियमाण असे म्हणतात .*
*– सदगुरु श्री वामनराव पै .*