मालवण :
किर्लोस कृषि विज्ञान केंद्रात गेल्या काही वर्षात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. गेली काही वर्षे या केंद्रात काम करणार्या स्थानिक कर्मचार्यांच्या पगारातील कमिशनही स्थानिक कमिटी सदस्यांकडून लाटले जात आहे. शिवाय कृषि विज्ञान केंद्राचे महाविद्यालय किर्लोस येथे न ठेवता अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी असा ठराव पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला. हा ठराव आपण स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे देऊन याची सखोल चौकशी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे श्री. घाडीगावकर यांनी स्पष्ट केले.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा आज छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाली. यावेळी झालेल्या चर्चेत किर्लोस गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी किर्लोस कृषी विज्ञान केंद्रासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली. या केंद्रात स्थानिक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या. मात्र गेल्या दहा ते पंधरा वीस वर्षात हे कर्मचारी आठ ते दहा हजार मध्ये काम करत आहे. या कृषी केंद्राची जी स्थानिक कमिटी आहे. त्यांचे सदस्य या कर्मचाऱ्यांच्या पगारातील कमिशन लाटत असल्याचा गंभीर आरोप घाडीगावकर यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांना या कृषी विज्ञान केंद्राचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही एकर क्षेत्र मोफत या केंद्रासाठी उपलब्ध करून दिले मात्र किरकोळ उपक्रम राबवण्या पलीकडे या केंद्राकडून म्हणावा तसा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शिवाय कृषी विज्ञान केंद्राचे महाविद्यालय हे या केंद्राच्या परिसरात करणे आवश्यक असताना ते सिंधुदुर्गनगरी येथील जैतापकर कॉलनी परिसरात करण्यात आले. मग जर अन्य ठिकाणी महाविद्यालय द्यायचे होते तर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी मोफत का घेण्यात आली? हे महाविद्यालय जर किर्लोस गावात झाले असते तर त्याचा शेतकऱ्यांबरोबर स्थानिक व्यवसायिकांना फायदा झाला असता. मात्र अन्यत्र हलविण्यात आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना परत करण्यात यावी अशी मागणी घाडीगावकर यांनी केली.
गेल्या काही वर्षात या कृषिविज्ञान केंद्रात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. या केंद्रात राबविल्या जाणाऱ्या योजना या केंद्रामार्फत राबविल्या जात आहे. मात्र त्याचा फायदा स्थानिक पातळीवर होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे स्पष्ट करत घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेतला. हा ठराव आपण स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे देत आहोत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे घाडीगावकर करणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.