सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी दुकाने निरीक्षकांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश द्यावेत..
मनसेची निवेदनाद्वारे मागणी
कालच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या “दुकानांवरील नामफलक हे मराठीत करावे” निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करीत असून मनसे अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे व मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापर्यत ‘मराठी भाषेसाठी ,अस्मितेसाठी आणि मराठी पाट्यासाठी’ अनेकवेळा आपल्या अंगावर ज्या केसेस घेतल्या आहेत. त्याचे खऱ्या अर्थाने आज चीज झाले अशी जन भावना आहे.राज्य मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे मोठ्या आस्थापनांसाहित छोट्या दुकांनावरील नामफलक आता मराठीत करावे लागणार आहेत. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील नामफलक मराठीत लागलेले दिसणे अपेक्षित आहे. सदर अधिनियमातील दुरुस्ती मध्ये मराठी-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीची तरतूद करून दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे हे देखील विशेष आहे. आज मितीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकानांचे फलक इंग्रजी वा अन्य भाषेतील दिसत आहेत. राज्य शासनाच्या कालच्या निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन मराठी भाषा व अस्मिता यापुढे प्रत्येक दुकांनावर अभिमानाने झळकावी , यासाठी आपल्या विभागाकडील सर्व दुकाने निरीक्षकांना कालच्या निर्णयाचे काटेकोर पालन व्हावे यासंबंधी उचित आदेश देण्यात यावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सदर निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रही मागणी असून यापुढे मनसेला कायदा हातात घ्यावा लागू नये अशी अपेक्षा आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळ-खट्याक स्टाईल आंदोलन हाती घेइल. जिल्ह्यात मराठी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेत दुकाने फलक आढळून आल्यास मनसेशी गाठ राहीलच शिवाय यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपली व संबंधित आस्थापना/दुकान मालकाची राहील असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी निवेदनाद्वारे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला दिला आहे.