You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्या…

प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मागणी…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात सरसकट बंद केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाधकाऱ्यांकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भकडवाड यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, सरचिटणीस सचिन मदने, उमेश गरुड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भावाची परिस्थिती ही ग्रामीण भागात म्हणावी तितकी जाणवत नाही. ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त ३० ते ४० या प्रमाणात आहे. ऑनलाईन शिक्षण देणे भौगोलिक परिस्थितीचा विचार करता या जिल्ह्यात कठीण असून गृहभेटीतून शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया हवी त्या प्रमाणात होत नाही. शिक्षणाची ज्याला अधिक गरज आहे असा खेड्यापाड्यातील विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रियेपासून गेली दोन वर्षे नाहक दूराबला गेला होता तो गेल्या महिन्या/ दीड महिन्यात पुन्हा या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने सहभागी झाला होता.

मागील तीस दिवसापासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण न मिळालेल्या गावातील तसेच किमान तीस ते चाळीस पटाच्या शाळा असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी संघटनेची मागणी आहे. त्याचबरोबर यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने एकत्र येऊन याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार त्यांचेकडे देण्यात यावेत, अशीही मागणी समाजातील सर्व स्तरावरून होत आहे. मोबाईलचा वाढता वापर, त्यांचे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम याहीपेक्षा नुकतेच शिक्षण प्रवाहात विद्यार्थी रुळत असतानाच अचानकपणे शाळा बंद झाल्याने ग्रामीण भागातील शिक्षणासाठीची गरजू मुले पुन्हा मागे पडतील याचीच जास्त भिती निर्माण झाली आहे. यासाठी आपण ग्रामीण भागातील कमी पटाच्या व मागील तीस दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न सापडलेल्या गावातील शाळा सुरू करणेस परवानगी द्यावी व विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी या संघटनेने केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा