सिंधुदुर्गनगरी
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या आधारावर राबविली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड एक जिल्हा एक उत्पादन म्हणून करणेत आलेली आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल 10.00 लाख अनुदान देय आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संसथा यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक या करिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय आहे. शिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटिग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांकरिताही लाभ देय आहे. सन 2021-2022 या योजने अंतर्गत भांडवली गुंतवणूकी करिता वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
दिनांक 30 डिसेंबर 2021 पर्यंत 68 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 25 सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असून 16 आराखडे बँक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरुवात झाली असून आतापर्यंत 8 प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.
इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी कृषि विभागामार्फत दिनांक 3 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी (स्वयं सहाय्यत गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी जिल्ह्यात 7 जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.