जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मान्यता असल्याची महेश सुकी यांनी दिली माहिती.
सावंतवाडीत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शहराचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये सावंतवाडीत व्यापाऱ्यांशी बोलून लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे.
शहरात बाजारपेठेत अत्यल्प वर्दळ असते, परंतु अनैतिक धंदे, दारू, जुगार क्लब अशा धंद्यांवर मात्र दिवसरात्र तासनतास लोक गर्दी करून खेळत असतात. तोंडाला मास्क अथवा सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता होणारी गर्दी लक्षात घेता शहरात वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या प्रमाणास असे गैरधंदेच कारणीभूत आहेत. बाजारपेठ बंद करण्यासाठी आग्रही असणाऱ्या नगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविकांनी दारू, जुगार, क्लब कोण चालवतात आणि तिथे गर्दी होते की नाही याची शहानिशा करायला नको का?
एकीकडे गैरधंद्याना पाठिंबा द्यायचा, पाठीशी घालायचे आणि दुसरीकडे पोटापाण्यासाठी गोरगरीब ज्या धंद्यांच्या जीवावर पोट भरतात ती दुकाने, हॉटेल्स बंद करायची अशी दुपट्टी भूमिका प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची दिसून येते.
सावंतवाडीत महेश सुकी यांच्या क्लबमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता संवाद मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली असता, “आपला क्लब हा अधिकृत असून क्लब चालवायला जिल्हाधिकारी मॅडमनी परवानगी दिली असल्याचे सांगितले”. क्लब चालविण्यासाठी परवाना दिला असेलही परंतु सावंतवाडीत वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता क्लबमध्ये होणारी गर्दी म्हणजे कोरोनाला आमंत्रण नाही का? क्लबमध्ये कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाते का? कोरोनाचे संकट असताना, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना क्लब सारख्या गर्दी होणाऱ्या धंद्यांना जिल्हाधिकारी अधिकृत मान्यता कशी काय देतात? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत.
सावंतवाडीत वाढत्या कोरोनाच्या संकटाचे भांडवल करताना लोकप्रतिनिधी असणाऱ्यांच्या नातेवाईकांनीच अधिकृतपणे चालवलेल्या क्लबमधून होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.