You are currently viewing या नात्यात आता गुरफटणे शक्य नाही

या नात्यात आता गुरफटणे शक्य नाही

  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचे अंत्य ओळ लेखन

अमित स्वतःच्याच मनात विचार करू लागला..

नाही,
आता त्या फंदात पुन्हा पडायचे नाही… झालं तेवढं बस्स झालं… आता आपलं सर्वकाही सुरळीत चालू आहे, आणि आयुष्यात प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम असंही काही नाही…आज भविष्याकडे डोळे उघडून पाहिलं आणि स्वतःचं भविष्य घडवलं तर उद्या प्रेम आपोआपच मागून चालतच नव्हे तर धावत येईल…

खिन्न मनाने का होईना असा थोडासा स्वार्थी विचार करून अमित भविष्याचा वेध घेत…मनाच्या वेलीवर बसलेली मनातली पाखरे मोकळ्या हवेत स्वैर उडवत पुढचं पाऊल टाकून आयुष्याकडे आशेच्या झरोक्यातून पाहत…जीवनात एक नवी पहाट येईल आणि पहाटेची सोनेरी किरणे जगण्याची नवी दिशा दाखवतील या एकमात्र आशेवर पायाखाली येणारे दवबिंदूंचे तुषार आपल्या तळाव्यांनी तुडवीत…भिजलेल्या पावलांनी नवी वाट चालू लागला….त्या नव्या वाटेवर भीती नव्हती काही गमावण्याची न काही गमावलेल्याचं दुःख…

शाळेत असल्यापासून अस्मिता आणि अमित एकमेकांच्या प्रेमात होते…प्रेम म्हणजे काय हे देखील त्यांना जाण नसेल तेव्हा….एकमेकांना आवडणे, एकमेकांबद्दल आकर्षण, ओढ म्हणजेच प्रेम…. शारीरिक आकर्षण देखील ज्ञात नव्हतं तेव्हा….आपण चेहऱ्यावर आल्यावर तिच्या अन आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटणे…पुन्हा पुन्हा तिला पाहण्याची ओढ वाटणे म्हणजेच प्रेम….
ना होता तेव्हा भविष्याचा विचार ना….पुढे काय वाढून ठेवलं हे माहिती…हातांना तिच्या हातांचा होणारा स्पर्श….एखादी लिम्लेटची गोळी एकाने दाताने तोडणे आणि दुसऱ्याने आवडीने ती चघळणे…त्या लिम्लेट गोळीतील गोडवा जिभेवरून पार अंतर्मनात उतरणे म्हणजेच प्रेम…हाच सरळ साधा मार्ग प्रेमाची परीक्षा पाहण्याचा….
अमित खूप श्रीमंत नव्हता…परंतु घरची गरिबी देखील नव्हती…तसं पाहता अस्मिताचे वडीलही नोकरदार…दोन्ही कुटुंब सधन… एकमेकांवरील प्रेमापोटी अस्मिताचे शाळा संपल्यावर शहरात अमित शिकत असलेल्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं…आता रोज त्यांची भेट होऊ लागली…प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या…अगदी लग्न सुद्धा घरातल्यांच्या परवानगीने करायचं…पण आधी नोकरी करायची…सेटल व्हायचं हे सर्व विचार झाले…प्रेमाच्या धुंदीत दोघंही एकमेकांसोबत आनंदी होती….कधी भेट झालीच नाही तर प्रेमपत्रांवर देखील भेट निभावून जायची….अमित शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी पुण्यात निघून गेला…अस्मिता आपलं शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरी करू लागली…..हळूहळू संपर्क कमी झाला…अस्मिता दुसऱ्यांच्या घरी राहत असल्याने पत्र पाठविण्याची देखील सोय नव्हती…त्यामुळे प्रेमात अंतर पडत गेलं….अमित नोकरीत व्यस्त झाला…मोकळ्या वेळात आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांच्या जोड्या पाहून आपल्या दोघांच्या सुंदर संसाराची स्वप्ने पाहू लागला…पुण्यातील बागेत बसला असताना बागेत बसलेली जोडपी, प्रेमी युगुल पाहून कधीतरी आपणही असेच या बाकावर खांदावर विश्वासाचा हात ठेवून बसलेले असू…अस्मिता सोबतच्या….संसाराची स्वप्ने आपल्या पापण्यांवर घेऊन कित्येक तास अमित बागेतील हिरवळीवर झोपून आकाशाकडे एकटक पाहत असायचा…

अस्मिता अमितच्या स्वप्नात रमण्यापेक्षा जिथे नोकरी करत होती….त्याच फर्मचा तरुणमालक सुहासच्या प्रेमात पडली…अमित बद्दल तिची ओढ कमी होऊ लागली…सुहास देखणा नव्हता पण पैशांनी मालामाल होता…घरच्या मालमत्तेचा एकुलता एक वारस…वयाने थोडासा मोठा होता परंतु रोज हाती येणाऱ्या व्यवसायातील पैशांमुळे बरेच छंद होते…व्यसनहीं त्याने जपलेली होती…कोवळ्या वयातील अस्मिता स्वतःहून त्याच्या जाळ्यात ओढली गेली…समुद्र किनारे, शहरातील बगीचे संध्याकाळी त्यांच्या प्रेम कहाण्यांनी सजू लागले….मोहरू लागले….बहरलेलं प्रेम इतरत्र पसरू लागलं…आणि हवेत पसरलेला सुहास अन अस्मिता यांच्या प्रेमाच्या मोहराचा सुगंध थेट पुण्यापर्यंत पोचला…अमित अस्मिताच्या बेवफा वागण्याने पार हादरून गेला…अस्मिताने आपल्या प्रेमाचा केलेला विश्वासघात त्याला सहन झाला नाही…
पण….
पुण्यासारख्या शहरात एकटा पडलेला अमित बोलणार कोणाशी…मनातलं दुःख खोलणार कोणाकडे? गळ्यापर्यंत आलेलं दुःख गिळून आत्तासा कुठेतरी सावरला होता…आयुष्याकडे नव्या उमेदीने पाहत होता…..
तोच पुन्हा एकदा भूतकाळ बनलेली अस्मिता त्याच्यासमोर वर्तमान बनून उभी ठाकली होती…
सुहासने तिच्या कौमार्याचा संपूर्ण आस्वाद घेत….जेव्हा मन भरलं तेव्हा तिला दूर सारलं होतं… सुहासच्या प्रेमात फसलेली आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अमितचा विश्वासघात करून त्याचं प्रेम लाथाडून दूर गेलेली अस्मिता पुन्हा एकदा अमितकडे आकर्षित झाली होती…कदाचित आपलं पहिलं प्रेम आपले सर्व गुन्हे माफ करून आपल्याला परत एकदा प्रेमाचा आधार देईल अशीच आशा घेऊन अस्मिताने अमितला “आपले अजूनही प्रेम तुझ्यावरच आहे” असे म्हणत नव्याने पुन्हा एकदा नात्याच्या बंधनात अडकण्याची इच्छा व्यक्त केली…
पिंजऱ्यातून उडालेला पक्षी आकाशात स्वैर विहार करून पुन्हा पिंजऱ्यात तेव्हाच येतो…जेव्हा मोकळा विहार करताना आकाशात उडणारे कावळे त्याच्यावर तुटून पडतात….अन त्याला आधाराची गरज वाटते….
अमित एव्हाना अस्मितापासून खूप दूर गेला होता….
अस्मिताच्या प्रश्नावर कोणताही विचार न करता त्याने असंच जणू काय आपल्या अविर्भावातून न बोलताच सांगून गेला…*या नात्यात आता गुरफटणे शक्य नाही*

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा