मुंबई :
ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची गेल्या दीड तासांपासून चौकशी सुरू आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असून तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशी दरम्यान कोणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही. दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली. ती रात्रभर झोपली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज सकाळी पावणे दहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दीपिका हजर झाली. त्यानंतर बरोबर १० वाजता तिची चौकशी करण्यात आली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन काढून घेतला. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही. दीपिकाची मॅनेजर करिश्माही १० वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दीपिकासोबत अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंग नाही. त्यामुळे दीपिका एकटीच एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.
दीपिका एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये येणार असल्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मीडियाने गर्दी करू नये म्हणून गेस्ट हाऊसबाहेर बॅरेकेड्स लावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एकूण पाच अधिकारी दीपिकाची चौकशी करत आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून तिची चौकशी सुरू झाली असून एनसीबी कार्यालयात ती एकटीच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.