कणकवलीत ३१ जानेवारीला ३४वा व्यापारी एकता मेळावा
कणकवली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३४ वा व्यापारी एकता मेळावा कणकवलीत चौडेश्वरी हॉलमध्ये यंदाही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय व्यापारी महासंघ व कणकवली व्यापारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून होणाऱ्या मेळाव्याला जिल्हयातील खासदार,आमदार, तसेच कणकवलीचे नगराध्यक्ष,पं.स.सभापती,चेंबरचे अध्यक्ष,सर्व संलग्न जिल्हा व तालुका स्तरीय संघटनांचे प्रतिनिधी आदींना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच व्यापार-व्यवसाय-उद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी काही नामवंत तज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित आहे.या ॲानलाईन मेळाव्याचे थेट प्रसारण स्थानिक वृत्तवाहिन्यां सोबतच युट्यूब,फेसबूक आदी प्रसार माध्यमाद्वारे केले जाणार असून महाराष्ट्र भरातून सुमारे १० हजार हून अधिक व्यापाऱ्यां हा मेळावा ऑनलाइन द्वारे पहाता यावे याचे नियोजन करण्यात आले आहे.
ऑनलाइन मेळाव्यात महासंघाच्या वतीने जाहिर झालेल्या जीवन गौरव पुरस्कार,कै.माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार,कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामिण व्यापारी संघटना पुरस्कार,आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार,कै.उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघाकडून देण्यात आली आहे.