मालवण :
मालवण शहरातील खड्डेमय रस्त्यांविरोधात आता व्यापारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. येथील रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, व्यापाऱ्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ मुख्य रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, आमच्या मागणीची पूर्तता न झाल्यास व्यापारी संघालाच नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
मालवण नगरपरिषद हद्दीतील भरड नाका ते सोमवार पेठ मालवण येथील नेवाळकर क्लॉथ स्टोअर्स या दुकानापर्यंतचा रस्ता हा अतिशय खराब झाला आहे. येथून दुचाकी, रिक्षा प्रवास करत असतात तसेच अनेक गाड्याही या रस्त्यावरून प्रवास करीत असतात. तसेच मशीद गल्ली ते भाग्यश्री हॉटेलचा रस्ता देखील व्यापाराच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. भरड नाका हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटकांची या रस्त्यावर रेलचेल सुरु असते, तरी हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा. या खड्डेमय रस्त्याचा परिणाम येथील स्थानिक व्यापारी वर्गावर होत असल्याचे निवेदन मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सादर करण्यात आले. या मागणीकडे दुर्लक्ष झाला तर मालवण व्यापारी संघ निवडणूक लढवायलाही मागे हटणार नाही, असा इशारा उमेश नेरुरकर यांनी दिला. यावेळी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करू, अशी ग्वाही मुख्याधिकारी जिरगे यांनी व्यापाऱ्यांना दिली.
दरम्यान, ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, तसेच बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असा सल्ला संतोष जिरगे यांनी दिला. यावेळी मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, कार्यवाह रवींद्र तळाशीलकर, शैलेश पालव, भाऊ सापळे, सुनील मालंडकर, हितेंद्र हिर्लोस्कर, उदय कुलकर्णी, बाबाजी बांदेकर, अरविंद सराफ, ओंकार चिंदरकर, दिलीप वायंगणकर, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर आदी उपस्थित होते.