सोनूर्ली-वेत्ये येथून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीस आरटीओ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?
सोनूर्ली-वेत्ये येथून गोवा, चिपी आदी ठिकाणी होणाऱ्या बोल्डर दगडांची ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात अनेकदा आवाज उठविण्यात आला, इन्सुली येथील साईप्रसाद राणे यांनी देखील अनेकदा तक्रारी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, परंतु आंदोलनाचा इशारा दिला की तात्पुरत्या स्वरूपात ओव्हरलोड वाहतुकीवर आरटीओ कडून निर्बंध आणले जातात आणि काही दिवस उलटले की “ये रे माझ्या मागल्या” या उक्तीप्रमाणे पुन्हा रात्रंदिवस ओव्हरलोड वाहतूक जोरदार सुरू होते.
आरटीओच्या नियमांनुसार डंपर मध्ये माल न भरता अतिरिक्त माल भरून गोवा, चिपी इत्यादी ठिकाणी सोनूर्ली, वेत्ये येथून बोल्डरची वाहतूक केली जाते. गाड्या ओव्हरलोड असल्याने खेडोपाडी अरुंद असणाऱ्या रस्त्यांवरून बेदरकार पणे डंपर हाकले जातात त्यामुळे छोटे मोठे अपघात हे रोजचेच झाले असून रस्त्याने छोटी वाहने, पादचारी जातात त्यांच्या जीवितास धोका देखील निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात आवाज उठविल्याने ओव्हरलोड वाहतूक काहीच दिवस बंद होती, परंतु पुन्हा एकदा सोनूर्ली वेत्ये येथून मोठया प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक तशीच सुरू झाल्याने इन्सुली चेकपोष्टवरील अधिकारी भ्रष्ट आहेत का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. इन्सुली चेकपोष्टवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याशिवाय ओव्हरलोड वाहतूक होणे शक्यच नसल्याने सुरू असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांवरच आरोप होऊ लागला आहे.
सोनूर्ली वेत्ये येथून रात्रंदिवस होणारी बोल्डर वाहतूक अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून सुरू असल्याचा आरोप साईप्रसाद राणे यांनी केला आहे. बेकायदेशीर सुरू असलेल्या या ओव्हरलोड वाहतुकीला आरटीओ अधिकारी कधी आळा घालणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.