शिक्षणाची द्वारे उघडली नसती तर आपण सर्वजण मागास राहिलो असतो
– तहसिलदार राजाराम म्हात्रे
सिंधुदुर्गनगरी
महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली म्हणून आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. जर ती झाली नसती तर आपण कित्येक वर्ष शिक्षणापासून मागास राहिलो असतो, असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. 4, खासकिलवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगर सेविका समृद्धी विरनोडकर, मुख्याध्यापक केशव जाधव, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, शहरस्तर संघाचे अध्यक्ष सुनिला केळजी, सीएमआरसीच्या अध्यक्ष गिता परब, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसिलदार म्हात्रे पुढे म्हणाले, आजच्या जयंती निमित्त झालेले सर्व कार्यक्रम ही खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल. प्लास्टिक प्रदूषणामुळे मिठी नदीला 2005 मध्ये पूर आला होता. हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर आई – वडिलांनी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रह धरावा. निश्चितच प्रबोधनाने बदल होऊन चांगली सुरुवात होईल.
परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून करावी, जेणे करून दुसऱ्याला सांगणे जबाबदारीचे ठरते, असे सांगून जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य तसेच त्यांचे साहित्य सर्वांनी वाचावे म्हणजे व्रत वैकल्यात अडकलेली आजची महिला त्यांना अपेक्षित नव्हती हे समजून येईल. किमान त्यांचे साहित्य वाचून थोडेसे जरी आचरणात आणले तरी खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल, असे सांगून त्यांनी कविता सादर केली.
यावेळी प्लास्टिकच्या पिशव्या टाळण्यासाठी आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी माविमच्या वतीने नगर पालिका स्तरातील शाळांना 4 हजार 989 कापडी पिशव्यांचे आणि कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर स्वच्छता पर्यावेक्षक रसिका नाडकर्णी, मोबाईलचे दूष्परिणाम या विषयावर समुपदेशक आर्पिता वाटवे तसेच चांगला स्पर्श वाईट स्पर्श या विषयावर समुपदेशक नमिता परब यांनी मार्गदर्शन केले. आर्या कुडतरकर, तनुष्का राणे या विद्यार्थिनींनी माता सावित्रीबाई फुले यांच्या विषयी व्याख्यान दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्यांच्या कार्यावर छोटीशी नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन माहेर लोकसंचलीत संघाच्या व्यवस्थापक वैष्णवी नाईक यांनी केले. मुख्याध्यापक केशव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला केंद्र प्रमुख स्नेहा लंगवे, शालेय समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.