जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लिहिलेला अप्रतिम लेख
पांडित्य आणि प्रतिभेत रमाबाईंइतक्याच श्रेष्ठ,प्रतिभाशाली
कवयित्री,उत्तम अभ्यासिका,नि:स्वार्थी समाज सेविका,व
जोतिबानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महान नेत्या,हजारो वर्षांच्या स्तब्धतेचा भंग करणारी रणरागिणी,
अशा सावित्रीबाईंना शतश: प्रणाम….!
“शूद्रांना सांगण्याजोगा । आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व । पशुत्व हटते पहा
इंग्रजी शिकूनी जातीभेद मोडा
भटजी भारूडा फेकुनिया ….॥”
असे उत्तम काव्य लिहिणाऱ्या सावित्रीबाई आपल्या संस्कृतीला
भूषणभुत आहेत.किंबहुना आधारस्तंभ आहेत.त्यांनी चार भिंतीत कोंडलेल्या स्री ला ज्ञान व स्वातंत्र्य यांचा प्रकाश दाखविला.क्रांतीची वाट कधीच सरळ नसते पण ते दोघे ती
वाट निर्धाराने चालत राहिले .त्यामुळेच महाराष्ट्रात स्री शिक्षणाची चळवळ सामर्थ्यवान बनली.फुल्यांनी चार भिंतीत
कोंडलेल्या स्री ला ज्ञान व स्वातंत्र्य यांचा प्रकाश जोडीने दाखविला.फुल्यांनी टाकलेल्या ठिणगीला पेटविण्याचे महान
कार्य सावित्री बाईंनी केले.
तर अशा , अतिशय कर्मठ अशा काळात ह्या स्रियांनी जुलुमी
पुरूषी समाजाला,कसे तोंड दिले असेल काय काय सहन केले
असेल याचा इतिहास उपलब्ध आहे .सावित्रीबाईंचा विचार आणि कृती यांच्या मागे जोतिबांचा वैचारिक पाया होता.जे
समाजात आज ही घडत नाही ते सारे सावित्री बाई बोलून
करूनही गेल्या.जोतिबांनी स्वत:च्या घरापासून या कामांना
सुरूवात केली.समाज बदलायला निघणारं हे पहिलंच जोडपं
असावं.स्वतंत्रपणे त्या जोतिबांबरोबर वाट चालत होत्या.
आज विधवाच नव्हे तर तरूण मुली चंगळवादाच्या आणि
वासना कांडाच्या भोवऱ्यात सापडल्या तर किती जणांचे
जन्मदाते आईबाप जोतिबा सावित्रीची माणुसकी सांभाळतांना
दिसतात ? सावित्रीबाई जोतिबां बरोबर उभ्या तर राहिल्याच
पण त्यातून त्यांनी” त्या काळी” बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू
केले.ते ही चक्क जाहिरात देऊन ! आहे आज ही हिंमत कुणाची ?” येथे येऊन बाळंतपण करून जा”…असे आवाहन
करून , अतिशय प्रेमाने, काळजीने त्यांनी या कात्रीत आणि
अंध:कारात सापडलेल्या गरोदर विधवा पतीत स्रियांची
सुटका आणि देखभाल केली.
बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी ठाम भुमिकेतून चालवल..
हे तर विलक्षण आहेच पण त्यातलं एक मूल स्वत: दत्तक घेणं
ही कृतिशीलतेची आणखी एक महत्वाची पायरी आहे.मूल होत नाही म्हणून घरच्यांनी दुसऱ्या लग्नाचा लकडा लावला असता,
जोतिबा म्हणतात..पुरूषाला जर अनेक लग्न करण्याची मुभा
आहे तर..स्रियांना का असू नये? हा विचार आज ही आपल्या
पचनी पडत नाही.तेव्हा त्या काळी असे बोलणे.. तोबा तोबा !
त्या काळी उच्चवर्णीय विधवा स्रियांची स्थिती भीषण होती.
सगळेच निर्बंध… “ पण लक्षात कोण घेतो?” या हरीभाऊंच्या
पुस्तकात याचे भीषण व विदारक वर्णन आहे जे वाचून आज ही तळ पायाची आग मस्तकाला जाते.. कशा सोसत असतील
त्या काळच्या स्रिया? त्यातून केशवपन ….! राम राम …
कुण्या दुष्टाने सुरू केली होती हो ही प्रथा ..?त्याला भर चौकात उभा जाळायला हवा होता … पण जिथे बोलण्याची
टाप नव्हती तिथे करणार कोण ..? सगळेच एका माळेचे मणी!
स्वार्थी आणि दुष्ट..
द ग्रेट सावित्री बाईंनी न्हाव्यांची मिटींग बोलवून न्हाव्यांचा संप
घडवला. विधवा स्रियांच्या बंधुभावातून हा संप घडला.
( वेतन वाढीसाठी नाही)माळी समाजात केशवपनाची प्रथा नसतांना ते उच्चवर्णियांसाठी लढत होते. अमानुष प्रथांवर हल्ला चढवत होते.
सावित्रीबाईंविषयी काय आणि किती लिहावे…? ती माऊली
सागराहूनही महान व आकाशाहूनही आहे. आपण तिची पायधूळ…आपल्या तोकड्या शब्दात ती कशी मावणार?
सावित्री बाईंच्या जीवनातील काहीच प्रसंगांचा मी उल्लेख केला. खरोखर ग्रंथात मावू नये असे त्यांचे महान कार्य आहे.
म्हणूनच सावित्री ही शतकातून एखादीच जन्मते .. व जीवाला
कायमची चुटपूट लावून जाते …आपल्याच मातीत जन्मलेली व
घडलेली ही माणसे … किती फरक आहे हो त्यांच्यात व
आपल्यात …आपल्याच जगण्याची आपल्याला लाज वाटावी
असे कर्तृत्वशून्य व निलाजरे जीवन आपण जगतोच पण जे
कोणी नेटाने काम करू पाहतात त्यांच्या पायात तंगडं अडकवून त्यांना पाडण्यात आम्ही धन्यता मानतो …
नाही हो नाही … त्यांची व आपली तुलनाच होऊ शकत नाही ..
“ कालाय तस्मै नम: … किंवा “ बहुरत्ना वसुंधरा ..”
आणि हो .. ही फक्त माझी मते आहेत …
धन्यवाद …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३ जानेवारी २०२२
वेळ : दुपारी २: २७