सावंतवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले असून या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्यातील एका प्लांटमध्ये ऑक्सिजनची निर्मिती, तर दुसरा प्लांटमध्ये साठवणूक केली जाणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील अडीअडचणी सुधा लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आपण येत्या पंधरा दिवसात बैठक बोलून चर्चा करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील रुग्णालयाची पाहणी केली. तसेच याप्रसंगी नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, पी.डी. वजराठकर, प्राची राणे, आशा मिशाळ, सुप्रिया नाईक आदी उपस्थित होते.